esakal | तुकाराम मुंढे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत; कोणत्या वादग्रस्त निर्णयामुळे नव्हे तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion on social media about commissioner Tukaram Mundhe

तुकाराम मुंढे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत; कोणत्या वादग्रस्त निर्णयामुळे नव्हे तर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांचे नाव जरी कानावर पडले तरीही नागपूर महानगरपालिकेत सर्वत्र "अटेंनशन' होते. त्यांनी कामकाज स्वीकारून एक ते दीड महिनाच झाला असून, पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वजण त्यांच्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. कडक स्वभावाचे मुंढे हे सार्वजनिक जिवनामध्ये क्वचितच हसताना दिसतात. मात्र, जयंत पाटील यांनी त्यांचासोबत हास्यविनोदात रमलेला फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्‍काच बसला आहे. 

आयुक्‍त तुकाराम मुंढे यापूर्वी जेथे-जेथे राहिले तेथे पदाधिकाऱ्यांशी होत आलेला वाद हाच चर्चेचा विषय राहिला आहे. नागपुरात त्यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यावरही तेच घडले. सर्वप्रथम सत्ताधाऱ्यांशी त्यांचा विकासकामांवरून वाद झाला. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांचेही त्यांच्यासोबत वाजले. पण, एकंदरीतच तुकाराम मुंढे यांची कार्यशैली बघता ते विरोधाची आणि विरोधकांची परवा न करता आपले काम करत राहतात. जनहिताचे निर्णय घेतात. त्यामुळे जनतेमध्ये विशेष करून युवांमध्ये त्यांची "क्रेझ' आहे. 

मंत्र्यांसोबत काढलेले फोटो अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांकडून सोशल मीडियावर शेअर केले जातात. परंतु, येथे मात्र उलटेच झाले. खुद्द जयंत पाटील यांनी हास्यविनोद करतानाचा फोटो ट्विट केला. फोटोमध्ये दिसणारी मंडळी कशासाठी हसतायत?, कुणी जोक केला?, कुणावर केला? हे कळू शकले नसले तरीही नेटीझन्सकडून मात्र त्यावर चिक्कार प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत आहे. 

तुकाराम मुंढे यांना "शिक्षण, एमपीएससी विभागाचे आयुक्त करा', "जिल्हाधिकारी म्हणून पाठवा', "अधिकारी आणि मंत्र्यांची भेट अन्‌ मुंढे साहेबांच दिलखुलास हास्य, याचा अर्थ प्रशासन हे सुशासन होत आहे. हे चित्र बघून यशवंतराव चव्हाण आणि राम प्रधान साहेब यांची आठवण झाली', "अशा अधिकाऱ्यांचे धैर्य आपण वाढवले पाहीजे. जेणेकरून ते त्यांचे कौशल्य आणि कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करू शकतील.', "मुंढेंची प्रतिमा राजकीय मंडळी आणि कर्मचाऱ्यांचे विरोधक अशीच झाली आहे. पण या फोटोने राजकीय मंडळींसोबतही ते संवाद साधतात, हे जनतेला कळेल आणि त्यांची प्रतिमा बदलेल', अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 

हेही वाचा - जादूटोणा केल्याचा संशय आला आणि उचलले टोकाचे पाउल...

मुंबईत झाली भेट

तुकाराम मुंढे यांनी मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विधानभवनातील कार्यालयात भेट घेतली. तो फोटो स्वतः जयंत पाटील यांनी ट्‌विट केला आहे. यामध्ये ते हास्यविनोदात रमलेले दिसत आहेत. मुंढे साहेबांचा हसतानाचा फोटो पाहून कुणाला आश्‍चर्य तर कुणाला भारी कौतुक वाटले. 

फोटो चांगलाच व्हायरल

धडाडीचे निर्णय आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असते. त्यामुळे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याचे आणि हलक्‍यापुलक्‍या स्वभावाचे दर्शन तसे दुर्मिळच असते. जयंत पाटील यांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच स्वत: तुकाराम मुंढेंनी या फोटो रिट्विट केला आहे. 

go to top