या अशा काळात, रोग म्हणे, कपाशीला ‘मर’!, काय आहे प्रकार....

मनोज खुटाटे
Wednesday, 16 September 2020

सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल होत आहेत. यावरून कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जलालखेडा (जि.नागपूर): सध्या पेरणीनंतर ७५ ते ९० दिवसांमध्ये कपाशी पीक असून, बहुतांश ठिकाणी पाने, फुले व बोंड धरण्याच्या अवस्थेमध्ये पीक आहे. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडत नसला तरी त्याचे वितरण अनियमित आहे. ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, तिथे कपाशीच्या झाडांची वाढ जोमात झालेली दिसत आहे. अनेक ठिकाणी झालेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच शेतांमध्ये पावसाचे पाणी साठलेले आढळून येत आहे. सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल होत आहेत. यावरून कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचाः कोण ‘तो’? आसवांच्या ओंजळीत सोडून गेला आठवणींचे पक्षी!
 

उत्पादनावर होणार मोठ्या प्रमाणात परिणाम
वास्तविक अनेक रोगकारक घटकांमुळे दिसून येणाऱ्या ‘मर’ रोगाच्या तुलनेत आकस्मिक ‘मर’ रोग हा तुरळक प्रमाणात दिसत असला तरी काही भागात रोगाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. हे सध्या जरी मोजणे अवघड असले तरी शेतकरी मात्र धास्तावलेला आहे. शास्त्रज्ञांनी त्याच्या अनेक शोधनिबंधात दिलेल्या निष्कर्षानुसार शास्त्रीयदृष्ट्या या विकृतीसाठी कुठलीही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसल्याचे म्हटले आहे. या आकस्मिक मर रोगासाठी बीटी कपाशीसह अनेक संकरित वाण हे देशी कपाशी वाणांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहेत.

शास्त्रज्ञांनी आकस्मिक ‘मर’ रोगाची दिलेली कारणे...
-झाडांकडून पोषण अन्नद्रव्यांची आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणे.
-दीर्घकाळ उच्च तापमान व सूर्यप्रकाशासह पाण्याचा ताण, त्यानंतर अतिवृष्टी किंवा सिंचनाद्वारे शेतात अधिक पाणी दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
-भारी आणि खोल जमिनीत पाणी साचत असल्याने त्या जमिनी या रोगास पोषक ठरतात. चांगला निचरा होणाऱ्या जमिनीच्या तुलनेमध्ये पाणी साचलेल्या जमिनीत रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

अधिक वाचाः मास्क घालायला सांगणाऱ्या डॉक्टरचेच फोडले थोबाड, कोण होते ‘ते’?
 

ही आहेत लक्षणे
-आकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो.
- रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ किंवा पात्या, फुले आणि बोंडाचे प्रमाण अधिक झाल्यास वाढलेले दिसून येते.
-प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पाने पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात.
-अकाली पानगळ, पाते व बोंडगळ सुद्धा होऊ शकते.
पानांच्या वाढलेल्या श्वसनामुळे पाने मलूल पडतात.
-अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते.
-रोगग्रस्त झाडात अँथोसायनिन (जांभळा-लाल) रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसून येऊ शकते.

हे उपाय करून पहा-
-शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
-प्रदीर्घ काळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये. झाडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास सिंचन करावे.
-भारी जमिनीत शेणखताचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
-प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. (प्रमाण प्रति लिटर पाणी)
-कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू.पी.) २.५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम (ॲग्रेस्को शिफारस)
किंवा
कार्बेन्डाझिम (५०% डब्लू.पी.) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम. (लेबल क्लेम).

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diseases die on cotton