
चार महिन्याचे गर्भ पाडण्यासाठी तो तिला घेऊन डॉ. मून यांच्याकडे उपचारासाठी घेऊन आला होता. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती आणखीच गंभीर झाली होती. त्यामुळे डॉ. मून यांनी तिला यवतमाळला भरती करण्याचा सल्ला दिला होता.
नागपूर : डॉक्टर उपचार करण्यास सक्षम असतात. त्यांच्याकडे आवश्यक ते कौशल्य आणि सुविधा असली तरी कुठल्याही रुग्णाला बरे करण्याची ते हमी देऊ शकत नाही, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील डॉक्टर राजरतन मून यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली.
याचिकाकर्त्याने उपरोक्त डॉक्टरच्या विरोधात सहा ऑगस्ट २०१३ ला फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्याचे एक युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून संबंधित युवती गर्भवती झाली. चार महिन्याचे गर्भ पाडण्यासाठी तो तिला घेऊन डॉ. मून यांच्याकडे उपचारासाठी घेऊन आला होता. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती आणखीच गंभीर झाली होती. त्यामुळे डॉ. मून यांनी तिला यवतमाळला भरती करण्याचा सल्ला दिला होता.
तेथे नेण्यापूर्वीच वाटेत मुलाचा मृत्यू झाला. यास डॉ. मून आणि रुग्णवाहिका चालक पोटू आत्रात यांना दोषी ठरवून दोघांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. डॉ. मून यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे प्रेयसी दगावल्याचा याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, डॉ. मून यांच्या वकील राहील मिर्जा यांनी नियमानुसार तपास अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यापूर्वी मेडिकल बोर्डाच्या विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक होते असा युक्तिवाद केला. याप्रकरणी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने डॉक्टर मून यांची या प्रकरणातून सुटका केली.
संपादन - नीलेश डाखोरे