या देशातील कोणतीही वस्तू खरेदी करू नका : कॅटचे बहिष्काराचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

चीनमधून होणारी एक लाख कोटींची आयात कमी करण्याचा प्रयत्न आहे. चीनमधील कोणतीही वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन व व्यापक प्रचार या अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. 

नागपूर : अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) चिनी उत्पादनांच्या बहिष्काराची मोहीम आजपासून रेल्वे कॅटरिंग सेवा देणारी कंपनी आणि संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून चहापाण्याचे ग्लास आणि मास्क देऊन देशपातळीवर सुरू केली.

'भारतीय सामान, हमारा अभिमान' संदेश असलेले पाच कोटी ग्लास व मास्क शताब्दी आणि राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये 31 डिसेंबरपर्यंत वाटप केले जाणार आहे. यातून चीनमधून होणारी एक लाख कोटींची आयात कमी करण्याचा प्रयत्न आहे. चीनमधील कोणतीही वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन व व्यापक प्रचार या अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. 

या अभियानाअंतर्गत चीनमधून भारतात आयात होणाऱ्या तीन हजार वस्तूंची यादी प्रथम टप्प्यात कॅटने तयार केली आहे. या तीन हजार वस्तूंचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात होते व गुणवत्ताही चांगली आहे. यात व्यापाऱ्यांनी चिनी उत्पादने विकू नये. याशिवाय ग्राहकांनी स्वदेशी वस्तू, उत्पादने विकत घेण्यावर भर द्यावा, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. 'लोकल ते व्होकल'ला पुढे नेण्यात येणार आहे. चीनमधून भारतात चार प्रकारच्या वस्तूंची आयात होते. त्यात कच्चा माल, तयार वस्तू, स्पेअरपार्ट आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनाचा समावेश आहे.

हेही वाचा : बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच... 

कॅटने पहिल्या टप्प्यात चीनमधून येणाऱ्या तयार मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाच कोटी ग्लास व मास्कच्या माध्यमातून देशभरात कॅटमध्ये चीनच्या वस्तूंवरील बहिष्काराचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला आहे, असे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont's buy Chinese goods