डॉ. अशोक अरबट म्हणतात, खासगी आरोग्यसेवांचे वास्तव समजून घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

महाराष्ट्र शासनाच्या नोटिफिकेशनप्रमाणे नागपूर महानगरपालिकेने अमलात आणलेल्या 4 जून 2020 रोजीच्या आदेशाप्रमाणे सर्व खासगी इस्पितळांनी 80 टक्के बेड्‌स अन्य आजारांसाठी (नॉन-कोव्हिड) आरक्षित ठेवून त्यावर शासनाने ठरवून दिलेले शुल्क आकारावे, असे बंधन लादण्यात आले आहे. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेली खासगी आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल. आज नागपुरातील खासगी इस्पितळात चोवीस तास तीन शिफ्टमध्ये कार्य सुरू असते. दहा हजार खाटांच्या इस्पितळांमधून किमान एक लाख कुटुंबांना रोजगार मिळतो, याची दखल घेण्यात यावी.

नागपूर : पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत आपल्याकडे वैद्यकीय सेवा स्वस्त आहे. यामुळेच शहर असो की राज्य किंवा देश, आरोग्यसेवेत खासगी आरोग्य सेवांचा वाटा 80 टक्के आहे. तर 20 टक्के आरोग्य सेवा शासनाकडून दिली जाते. शासनाकडून अनुदानाची अपेक्षा न करता खासगी आरोग्य क्षेत्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांमध्ये स्वेच्छेने सहभागी होते. कोव्हिड-19च्या काळात तर खासगी आरोग्य व्यवस्थेसमोरही मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा वेळी शासन व समाजदेखील खासगी रुग्णालयांकडून अवास्तव अपेक्षा करतात. मात्र, त्यांनी खासगी आरोग्य सेवांचे व रुग्णालय प्रशासनाचे वास्तव समजून घ्यावे, असे आवाहन विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या नोटिफिकेशनप्रमाणे नागपूर महानगरपालिकेने अमलात आणलेल्या 4 जून 2020 रोजीच्या आदेशाप्रमाणे सर्व खासगी इस्पितळांनी 80 टक्के बेड्‌स अन्य आजारांसाठी (नॉन-कोव्हिड) आरक्षित ठेवून त्यावर शासनाने ठरवून दिलेले शुल्क आकारावे, असे बंधन लादण्यात आले आहे. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेली खासगी आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल. आज नागपुरातील खासगी इस्पितळात चोवीस तास तीन शिफ्टमध्ये कार्य सुरू असते. दहा हजार खाटांच्या इस्पितळांमधून किमान एक लाख कुटुंबांना रोजगार मिळतो, याची दखल घेण्यात यावी.

रोजच्या जीवनात आपण खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतो. त्यात घरभाडे, शाळेच्या फीपासून ते मनोरंजनाच्या खर्चाची तरतूद असते. मात्र, आपत्कालीन आरोग्य खर्चाची तरतूद करण्याचे टाळतो. आपण विकत घेतलेल्या कारची सर्व्हिसिंग नियमित करतो. मात्र, हे शरीर आपणास मोफत वापरण्यास मिळाल्याने त्याच्या सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करतो. यामुळेच मोठा आजार बळावतो. खासगी इस्पितळात लागणारा खर्च फार मोठा असल्याने तो झेपत नाही व आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून जातो.

अवश्य वाचा- आर्थिक अडचणीतून सलून व्यावसायिकाने घेतला हा टोकाचा निर्णय...

खाजगी आरोग्यसेवा व्हावी सक्षम
खासगी वैद्यकीय व्यवसाय आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. तो मोडला तर भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडून जाईल. खासगी वैद्यकीय क्षेत्राला सक्षम करण्यासाठी महत्त्व द्यावे. खासगी आरोग्य सेवा देणाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्या. कोविडसारख्या साथी येत राहिल्या आणि शासन खासगी वैद्यकीय सेवांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करीत राहिले तर खासगी आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवणे हे एक आव्हान ठरेल. शासकीय आरोग्य सेवा मजबूत, सक्षम, कार्यदक्ष, तत्पर व लोकाभिमुख करण्याची गरज आहे.
-डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन, नागपूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ashok Arbat says, Understand the reality of private healthcare