पुरातत्त्व संशोधक डॉ. श्रीपाद चितळे यांचे निधन

योगेश बरवड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

श्रीपाद चितळे हे पुरातत्त्व विषयक संशोधनाला समर्पित व्यासंगी व अभ्यासू व्यक्तीमत्त्व होते. विदर्भातील पुरातत्त्वीय अवशेष व प्राचीन स्थळांबद्दलचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अवगत केलेले ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता सततच्या लिखाणातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

नागपूर : उपराजधानीतील ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक, इतिहासतज्ज्ञ, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचीन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे शनिवारी (ता.१) सकाळी ५.३० वाजता महालमधील कोठी रोड येथील राहत्या घरी ब्रेन हॅमरेजने निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

सतत भटकंती, इतिहास आणि पुरातत्त्वाविषयी माहिती देणारी व्याख्याने हा त्यांचा कायम छंद होता. त्याच अनुषंगाने त्यांनी नागपुरात ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला. अनेक जण या उपक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक वारशांची माहिती घेत होते. ते स्वतः लोकांसोबत फिरून पुरातत्व वास्तू, तिचे एतिहासिक महत्व, वास्तूशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींची सविस्तर माहिती देत असत. लोकप्रियता वाढत गेल्याने हा उपक्रम नंतर विदर्भातही सुरू झाला होता. अगदी कोरोनाचा काळ सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू होता.

सविस्तर वाचा - स्तनपान आहे बाळाचा जीवनाधार

श्रीपाद चितळे हे पुरातत्त्व विषयक संशोधनाला समर्पित व्यासंगी व अभ्यासू व्यक्तीमत्त्व होते. विदर्भातील पुरातत्त्वीय अवशेष व प्राचीन स्थळांबद्दलचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अवगत केलेले ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता सततच्या लिखाणातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. संशोधनावर आधारित ३८ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आणि असंख्य लेख विविध वृत्तपत्रे, मासिके व अन्य ठिकाणी लिहिले आहेत. हे लेख वैदर्भीय इतिहासाचा मागोवा घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. या कार्यासाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.  

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Shreepad Chitale no more