‘किसान स्पेशल’ ठरणार संत्रा उत्पादकासाठी संजीवनी

विजयकुमार राऊत 
Wednesday, 7 October 2020

रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नातून किसान स्पेशल गाडी १४ व १९ ऑक्टोंबर रोजी धावणार आहे.

सावरगाव : संत्र्याचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेल्या नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल आता थेट रेल्वेद्वारे बांगलादेश व देशातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नातून किसान स्पेशल गाडी १४ व १९ ऑक्टोंबर रोजी धावणार आहे.

२० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी किसान रेल्वे चालवावी अशी मागणी केली होती. त्यावर कार्यवाही करीत रेल्वेने किसान रेल्वे गाडी चालविण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे नागपुरी संत्र्यासाठी १४ ऑक्टोंबरला देशांतगर्त किसान स्पेशल गाडी नागपुरी संत्र्याची वाहतूक करणार आहे, तर १९ ऑक्टोंबरला वरुडवरून ही गाडी बांगलादेशकडे कूच करणार आहे. बांगलादेश येथे जाणाऱ्या गाडीसाठी व्यापारी व संत्रा उत्पादक शेतकरी कंपन्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करून पाठविणार आहेत.

याशिवाय मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकावर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशी व शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक तर खास चवीसाठी प्रसिध्द असलेली नागपुरी संत्री थेट शेतातून स्थानकावर पोहचतील. यामुळे प्रवाशांना संत्र्याचा गोडवा वेळेत चाखात येणार आहे.

खासदार तुमाने यांनी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना कळमेश्वरसह काटोल व नरखेड व मोवाड थांबा देण्याची मागणी केली आहे. मोवाड रेल्वे स्थानकावर तिकीट विक्री ठेकेदारास २४ तास उपस्थित राहावे, अशा सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय सर्व रेल्वे स्थानकावर विजेची व प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. नरखेड रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध समस्या सोडविण्याच्या सूचना खासदार तुमाने यांनी केल्या आहेत.

रामटेकच्या प्रतिनिधीची मागणी प्राधान्यक्रमवार

संत्रा उत्पादनात अव्वल असलेला नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड, सावनेर, कळमेश्वर व हिंगणा तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी हे तालुके पूर्वी रामटेक मतदारसंघात होते. यामुळे रामटेक मतदारसंघ पूर्वीपासूनच संत्रा उत्पादनासाठी देशासह जगात प्रसिद्ध आहे. परिणामी रामटेकच्या खासदारांनी संत्रा निर्यातीसाठी व त्याच्या वाहतुकीसाठी केलेली मागणी प्राधान्यक्रमाने मानली जाते व त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाते. असे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे म्हणाले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the efforts of shiv sena MP kripal tumane from ramtek kisan special train will run