नववी ते बारावीच्या वर्गांबाबत शिक्षण संस्था मंडळाने दिली महत्त्वाची सूचना...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍नही सोडवला जाईल. जेथे आणखी शिक्षकांची आवश्‍यकता असेल, तेथे संस्थेला कंत्राटी किंवा तासिका तत्त्वावर शिक्षक नेमण्याची अनुमती देण्यात यावी.

नागपूर : राज्यातील शाळा कधी व कशा सुरू होणार यावर राज्य सरकारमध्ये खलबते सुरू आहेत. पालकांमध्येही संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करावेत, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाला केली आहे.

शाळा सुरू करताना एका वर्गात तीसपेक्षा जास्त विद्यार्थी असू नये. पहिली ते बारावी अशा सर्व वर्गांसाठी हा नियम पाळला जावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतराचे नियम पाळले जातील. याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍नही सोडवला जाईल. जेथे आणखी शिक्षकांची आवश्‍यकता असेल, तेथे संस्थेला कंत्राटी किंवा तासिका तत्त्वावर शिक्षक नेमण्याची अनुमती देण्यात यावी.

पहिली ते आठवी हे वर्ग सुरू करण्याची घाई केली जाऊ नये. सध्या 9 ते 12 हे वर्ग सुरू केले जावेत. वर्गांचा कालावधी हा 4 ते 4.30 तासांपेक्षा जास्त नसावा. एक दिवसाआड शाळा, घरून अभ्यास करून आणणे हे पर्यायदेखील वापरत येतील, असेही महामंडळाने सुचवले आहे.

हेही वाचा : मंत्री महोदय जरा नागपूरकडेही लक्ष द्या...

ऑनलाइनवर भर नसावा
ऑनलाइन अभ्यास पद्धत स्वीकारताना तिचे प्रमाण 30 टक्के इतकेच असावे. ग्रामीण भागाचा विचार करून ऑनलाइन अभ्यासावर अतिरिक्त भर दिला जाऊ नये. पूर्व प्राथमिक, बालवाडी किंवा नर्सरीच्या शाळा दिवाळीपूर्वी सुरूच करू नये, असे पत्र महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे.

संबंधित बातमी : सांगा, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे कधी?

इतर सूचना

  • शाळेचे दररोज निर्जंतुकीकरण केले जावे.
  • निर्जंतुकीकरणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असावी.
  • विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, आरोग्य विमा यांची तरतूद केली जावी.
  • अभ्यासक्रमातील अनावश्‍यक भाग रद्द करण्यात यावा.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education board given important instructions for 9th to 12th class