अठरा गावांना पुराचा फटका, कालावधी दोन महिने, आता बोला ! मदतीचे काय?

संदीप गौरखेडे
Monday, 9 November 2020

चौराही धरण भरल्याने तेथील पाण्याचा विसर्ग पेंच आणि तोतलाडोह धरणात केला जातो. पाण्याची पातळी वाढल्याने पेंच आणि तोतलाडोह धरणाचे दरवाजे सहा मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पेंच आणि कन्हान नदीत करण्यात आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना त्याचा फटका चांगलाच बसला. याबरोबरच शेतपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुराचा फटका मौदा तालुक्यातील अठरा गावांना सोसावा लागला.

कोदामेंढी (जि.नागपूर): मध्यप्रदेशात संततधार पाऊस सूर होता. दोन्ही राज्याच्या सीमेलगत असलेले चौराही धरण जवळपास पूर्णपणे भरले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील पेंच आणि तोतलाडोह धरणाची देखील तीच स्थिती. ऑगस्ट महिना तसा पावसाचा. चौराही धरण भरल्याने तेथील पाण्याचा विसर्ग पेंच आणि तोतलाडोह धरणात केला जातो. पाण्याची पातळी वाढल्याने पेंच आणि तोतलाडोह धरणाचे दरवाजे सहा मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पेंच आणि कन्हान नदीत करण्यात आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना त्याचा फटका चांगलाच बसला. याबरोबरच शेतपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुराचा फटका मौदा तालुक्यातील अठरा गावांना सोसावा लागला.

अधिक वाचाः सावलीही मला ‘या’ उन्हाने दिली, ‘ते’ गझलनवाजांच्या गायकीचे झाले ‘हमसफर’
 

जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी
ऑगस्ट महिन्यात २८ ते ३० तारखेला तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. १९९४ सालच्या पुरापेक्षा देखील हा पूर भयंकर असल्याचे सांगणारे सांगतात. एवढी हानी आणि नुकसान याआधी झाले नव्हते. क्षणात होत्याचे नव्हते झाले. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा मात्र दिला होता. पण पूर आल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्यात प्रशासनाची देखील चांगलीच दमछाक झाली. पुरात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. सिंगोरी, किरणापूर, कुंभापूर, नानादेवी, रहाडी, डहाळी, माथनी, मौदा (झोपडपट्टी), झुल्लर, चेहडी, सुकळी, वांजरा, पौडदौना, वढणा, पानमारा, मोहखेडी, कोटगाव, नांदगाव या नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसला. एक हजार ४८२ घरांची पडझड झाली असून चार डेरीवर  पाल आणि ताडपाल टाकून संसार थाटला आहे. शासनाकडून घरकुल बांधून मिळेल, या आशेवर आहेत. १९३८.९४ हेक्टर आर क्षेत्रफळाखालील शेतपिकांचे नुकसान झाले. धान, कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पीक पुरात वाहून गेले. काही ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली तर काही ठिकाणी वाळूचा खच साचला. पुरात २६४ गायी, बैल आणि शेळ्या वाहून गेल्या. पूरबाधितांचे जवळपास साडेतीन कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शासनाकडून पूरपीडितांना सानुग्रह पाच हजाराच्या मदतीची फुंकर घालण्यात आली. त्यातही काहींना मिळाली नसल्याची ओरड आहे.

अधिक वाचाः दुहेरी संकटाने शेतकऱ्यांचे निघतेय दिवाळे, अल्पभूधारकांच्या शेतीची झाली माती
 

धग आजही कायम
पूरपरिस्थितीत शासनाने पूरपीडितांची राहण्याची व्यवस्था मौदा येथील जनता हायस्कुल, सेंट रोझेलो झुल्लर, गांधी विद्यालय वडोदा आणि नरसाळा येथील समाज भवनात करण्यात आली होती. पूर ओसरल्यानंतर शासनाने जनावरांसाठी चारा छावणीची व्यवस्था केली नसून बऱ्याच गावात पाणी पुरवठ्याच्या विहिरीचा देखील उपसा करण्यात आले नाही. पूर ओसरून दोन महिन्याचा कालावधी लोटला मात्र तेथील पूरपीडितांची धग आजही कायम आहे.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighteen villages hit by floods, duration two months, now speak! What's the help?