
नागपूर : शहरात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येचा आकडा एकदमच फुगला होता. एकाच दिवशी एम्स, मेयो, मेडिकल, नीरी आणि पशुवैद्यक या पाच प्रयोशाळेतून 44 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. गुरुवारी यात तब्बल 43 रुग्णांची भर पडली. मध्यरात्री 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर सकारी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातच शहरात 22 वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला. आठ महिन्यांच्या गर्भवतीमातेसह कोरोनाबाधितांचा उच्चांक शहराने गाठला असून, प्रशासन पुरते हादरले आहे.
शहरात 11 मार्च रोजी पश्चिम नागपुरातील पहिला कोरोनाबाधित आढळला. यानंतर पश्चिम, दक्षिण पश्चिम, मध्य आणि उत्तर आणि पूर्व नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. दीडशेवर कोरोनाबाधित हे सतरंजीपुरा येथील असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. परंतु, शहरात कोरोनाने धडक दिल्यानंतर दीड महिना दक्षिण नागपूर सुरक्षित होते. परंतु, मेडिकलमध्ये युवक दगावल्यानंतर पार्वतीनगरदेखील कोरोना संवेदनशील बनले आहे.
बुधवारी शहरातील पाचही प्रयोगशाळेत अवघे 179 नमुने तपासण्यात आले. यातील 44 नमुने बाधित आढळले. एम्समध्ये 19 नमुने तपासण्यात आले. यातील 9 जण कोरोनाबाधित आढळले. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) एका गर्भवतीसह 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल मेयो प्रयोगशाळेतून आला होता. पशुवैद्यक प्रयोगशाळेतूनही नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला होता.
नीरी प्रयोगशाळेतूनही बुधवारी 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदानातून स्पष्ट झाले. याशिवाय मेडिकलमधून दोघांचे नमुने बाधित आढळले असून, यातील एकाचा मृत्यू झाला. हे सर्व चिंचभवन, व्हिएनआयटी, सिम्बॉयसिस, आमदार निवास, रविभवन, लोणारा येथील विलगीकरणात असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी 44 जण बाधित आढळल्यामुळे नागपुरातील सारेच कोरोना वॉर्डसह कोविड हॉस्पिटल हाउसफुल्ल होत असल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात होती.
गुरुवारच्या दिवसाची सुरुवात होत नाही तोच 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दिवसभरात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास एका दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा उच्चांक आजच मोडला जाईल. यामुळे प्रशनासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
मेडिकलच्या आपत्कालीन विभागात मृतक युवकावर उपचार करताना नमुने घेण्याची गरज होती. विशेष असे की, मृत्यूनंतर उघड्यावर मृतदेह पाठवला यामुळे यात मेडिकलचा हलगर्जीपणा दिसून आल्याची चर्चा होती. उपचार करणारे 6 निवासी डॉक्टरांसह परिचारिका आणि आरोग्यसेवक अशा एकूण 12 जणांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. मात्र, यात शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे की, नाही हे कळू शकले नाही. मेडिकलमध्ये कोरोना वॉर्डात, कोविड-19 हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या राहण्याची सोय मेडिकलमधील बंगले तसेच निवासी गाळ्यांमध्ये करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.