वादळवाऱ्याने नागपूर जिल्ह्यात कोलमडली वीजयंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान 10 लाखांच्या घरात आहे. अनेक भागातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे.

नागपूर : जेमतेम जून महिन्याची सुरुवात झाली आणि वादळासह पॉस सुरू झाला. पाऊस वेळेत सुरू झाल्याचा आनंद असला तरी सोबतच्या वादळामुळे सामान्यांच्या घरांचे आणि सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान 10 लाखांच्या घरात आहे. अनेक भागातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे.
रविवार (ता.31) व सोमवारी (ता.1) नागपूर शहरासह ग्रामीण भागात वादळीवाऱ्याने हजेरी लावली. ग्रामीण भागातील वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. सोबतच 12 रोहित्र नादुरुस्त झाले. सर्वाधिक फटका मौदा विभागाला बसला आहे. विभागातील 12 पैकी 5 रोहित्र नादुरुस्त झाले. मौदा, रामटेक, कामठी, कन्हान, झुल्लर, वडोदा या गावात विजेचे खांब जमीनदोस्त झाले.
याशिवाय काटोल विभागातील रिधोरा, बाजारगाव, सावरगाव, जलालखेडा, सावनेर विभागातील गोंडखैरी, कळमेंगरगाव, मकरधोकडा या गावांना तडाखा बसला. येथील खंडित वीजपुरवठा सुरळीत झाला असून काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून ते उभारणीचे काम सुरू असल्याने 2 दिवसात वीजपुरवठा सुरळीत होईल.
उमरेड विभागातील डोंगरगाव वीज उपकेंद्र रविवारी रात्री बंद पडले. परिणामी या वीज केंद्रातील सुमारे 5 हजार 600 वीज ग्राहक अंधारात बुडाले. महावितरणकडून रात्रीच या परिसरातील वीजपुरवठा टप्याटप्यात सुरळीत करण्यात आला. ग्रामीण भागातील एकूण 57 गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यात कापशी, चाफेगडी, निमखेडा, पाचगाव अडका, सुरगण आदी गावांचा समावेश आहे. आज दिवसभरात यातील बहुतेक गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. बुटीबोरी विभागात वरोडा एथ, रुई आणि झारी येथे 14, पेवठा येथे 3, बनवाडी 13 आणि गौसी 4 विजेचे खांब रविवारी कोसळले होते. या परिसरातही खांब उभारणीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

सविस्तर वाचा - सावधान! स्वच्छतागृह ठरत आहेत धोकादायक

झालेले नुकसान
उच्चदाबाचे 46 खांब पडून 1 लाख 12 हजारांचे, 105 विजेचे खांब पडून 3 लाख 12 हजारांचे, उच्च दाबाच्या 2. 6 किलोमीटर वीजवाहिनीचे 61 हजारांचे तर 11 किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे 2 लाख 10 हजारांचे नुकसान झाले आहे. 12 रोहित्र नादुरुस्त झाल्याने झालेले नुकसान 1 लाख 65 हजारांच्या घरात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity poles damage due to stromy rain