हुश्‍शSS-- बरे झाले ! टोळधाडीचे काटोल, नरखेड तालुक्‍यांतून पलायन

 फवारणीनंतर मरून पडलेले कीटक
फवारणीनंतर मरून पडलेले कीटक

जलालखेडा (जि.नागपूर) : टोळधाडीचे नवीनच संकट सोमवारी (ता. 25) नरखेड, काटोल तालुक्‍यांत अचानक दाखल झाले. पण, शेतकऱ्यांची सुचकता व कृषी विभागाची तत्परतेमुळे टोळधाडीचे संकट सध्यातरी शमले आहे. टोळधाड काटोल व नरखेड तालुक्‍यातून हद्दपार करण्यात यश आले असून, कीटक पूर्व दिशेने पसार झाले.

कृषी विभागाच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले
सोमवारी दुपारी अचानक पिकांचे काही वेळातच भरपूर नुकसान करणाऱ्या टोळधाड मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यात दाखल झाली. मोर्शी तालुक्‍यातून वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्‍याच्या मार्गाने नरखेड तालुक्‍यातील खलानगोंदी, तारा, उतारा, खापा घुडन या गावांत टोळधाडीचे आगमन झाले होते. याची माहिती मिळताच नरखेड तालुका कृषी विभाग सक्रिय झाला व अधिकाऱ्यांनी याची माहिती जिल्हा कृषी विभागाला दिली. पाच ते दहा किलोमीटर परिघात पसरलेल्या टोळधाडीवर कसे नियंत्रण मिळविता येईल या विचारात अधिकारी असताना त्यांनी अग्निशमन बंब, ट्रॅक्‍टर व इतर मशीनने फवारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील कृषी कार्यालयातून तीनशे लिटर औषध बोलावून घेतले. लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था काटोल नगर परिषदेने करून दिली. यानंतर तीन अग्निशमन बंब, तीन ट्रॅक्‍टर व यूपीएल मशीनच्या साहाय्याने सोमवारी रात्री फवारणीला सुरुवात करण्यात आली. ही फवारणी मंगळवारच्या सकाळपर्यंत केल्यानंतर परिस्थितीवर यश मिळाले. कृषी विभागाचे संयुक्त संचालक रवींद्र भोसले, कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, कृषी विभागाचे काटोल येथील उपविभागीय अधिकारी विजय निमजे, काटोलचे तहसीलदार अजय चरडे, काटोलचे तालुका कृषी अधिकारी रमेश कंनाके, कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांनी ही मोहीम फत्ते करून सध्यातरी या संकटावर मात केली.

हेही वाचा :पैसेवारी काढताच कशाला?

आधीच उपाययोजना करावी लागेल...
सध्यातरी काटोल व नरखेड तालुक्‍यांत टोळधाडीने पाहिजे त्या प्रमाणात नुकसान केले नाही. सध्या शेतात कोणतीच पिके नाही. संत्रा व मोसंबीच्या बागा आहेत; पण यावरही त्यांनी नुकसान केले नाही. भाजीपालांचे क्षेत्र कमी असल्यामुळे त्यांना नुकसान करता आले नाही. हा जर खरीप हंगामाचा काळ असता व जुलै, ऑगस्टमध्ये असे आक्रमण झाले असते, तर परिस्थिती बिकट झाली असती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात तरी टोळधाड येऊ नये यासाठी आधीच उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय हॉलीबॉलपटू म्हणते खेळावर "फोकस' करण्यासाठी नोकरी हवीच

सजग करण्याच्या सूचना देण्यात आल्या
सध्यातरी टोळधाडी तालुक्‍यातून निघून गेल्या असल्या तरी मात्र त्या परत येणार नाही, असे समजणे चुकीचे आहे. यामुळे सर्व कृषी विभागाचे कर्मचारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात शेतकऱ्यांना सजग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. विविध माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे काही संकट दिसल्यास तालुका कृषी विभागाच्या कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

"शेतकऱ्यांनो, सतर्कता बाळगा!'
कोरोनाची भीती संपत नाही, तोच जिल्ह्यात टोळधाडीचे आगमन झाले आहे. या
टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगून काही गोष्टी केल्यास या टोळधाडीपासून पिकाचा बचाव करता येईल.
जगदीश नेरलवार
तालुका कृषी अधिकारी
कळमेश्‍वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com