साहेब, पेरणी आली जी, चुकारे द्याल का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

कापूस विकूनही काही शेतकऱ्यांना चुकारेच मिळाले नाहीत. तालुक्‍यात पेरणीला सुरुवात झाली. आर्थिक संकटात असलेला शेतकरी साहेब, पेरणी आली जी कापूस मोजला का, अशी विचारणा कापूस खरेदी केंद्रावर करीत आहे.

सावनेर (जि. नागपूर) : तालुक्‍यात कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे 3,557 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी अजूनही 1,347 शेतकऱ्यांची मोजणी झालेली नाही. यातही काही ठिकाणी चुकीच्य सर्व्हेमुळे काही नावे सुटल्याचे पिपळा गावातील शेतकऱ्यांनी सांगितले.

कापूस विकूनही काही शेतकऱ्यांना चुकारेच मिळाले नाहीत. तालुक्‍यात पेरणीला सुरुवात झाली. आर्थिक संकटात असलेला शेतकरी साहेब, पेरणी आली जी कापूस मोजला का, अशी विचारणा कापूस खरेदी केंद्रावर करीत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्वच शेतकऱ्यांचा कापूस शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावासह खरेदी करावा, असे आदेश शासनाचे आहेत. तालुक्‍यात शासकीय खरेदी यंत्रणेची गती वाढविण्यासाठी चार केंद्र सुरू केले आहेत.

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; वाहनाची चौकशी केली असता आढळले हे...

मात्र, खरेदी केंद्राची गती पाहता पावसाळा तोंडावर असल्याने सरकारचे कापूस खरेदीचे आश्‍वासन फोल ठरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात खरेदी प्रक्रिया बंद होती. सुरू झाली तेव्हा या प्रक्रियेत काम करणारे कुशल कारागीर आपल्या गावी निघून गेले होते. सोशल डिस्टन्सिंगमुळे खरेदीची गती संथ आहे.
 

पंधरा दिवसांत मोजणी होणार पूर्ण

आता खरेदीची गती वाढली असून, बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मोजणीसाठी क्रमांकाने नंबर लागत आहे. पावसाने साथ दिल्यास पंधरा दिवसांत नोंदीनुसार मोजणी पूर्ण होईल, असा विश्वास आहे. बाजार समितीअंतर्गत जिल्ह्यात कापूस खरेदीची प्रक्रिया प्रथम क्रमांकाची ठरेल.
गुणवंता चौधरी, सभापती, बाजार समिती सावनेर
 

हंगाम सुरू, लागवडीचे आव्हान

रामटेक : मृग नक्षत्र सुरू झाले. तालुक्‍यात काही ठिकाणी सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी ढगांची दाटी पाहणेच नशिबी आले. खरिपाचा हंगाम सुरू झाला. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप विकला न गेल्याने त्यांची अवस्था सध्या "घर का न घाट का' अशी दोलायमान झाली आहे. ऑनलाइन नोंदणीच्या 30 मे या तारखेपर्यंत 557 पैकी 524 जणांनी नोंदणी केली. जवळपास 40 जणांची नोंदणीच होऊ शकली नाही. शेवटी खासगी जिनिंगकडून शासनाने हमीभावात खरेदी सुरू केली. त्यातील 296 शेतकऱ्यांचा 8190.90 क्विंटल कापूस शासनाकडून खरेदी करण्यात आला असून, (नोंदणी न झालेले) शेतकऱ्यांचा 6 हजार क्विंटल कापूस शिल्लक आहे. जूनपर्यंत सर्व कापूस खरेदी करण्यात येईल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले असले तरी आता पेरणीची वेळ आहे. बॅंकांनी पीककर्ज देण्यास हात आखडता घेतल्याने शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारी जाण्याची मोठी शक्‍यता आहे.

 

पेरा वाढणार

गेल्या तीन वर्षांपासून तोतलाडोह धरणाच्या वरील भागात मध्य प्रदेश शासनाने चौराई हे पेंच नदीवर धरण बांधल्याने तोतलाडोह धरणात येणारे पाणी अडवले जाते. त्यामुळे मागील वर्षी बरेच शेतकरी लागवड करू शकले नव्हते. मात्र, नंतरच्या काळात मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडल्याने चौराई धरणातून तोतलाडोह धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे यंदा या भागात चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता वर्तवली जाते. तालुक्‍याच्या उत्तर-पूर्व भागात शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना बसतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after selling cotton, the farmers did not get money