युवतींची छेड काढणाऱ्या विकृताला बेडया ; जिन्स, टी-शर्टवर असणाऱ्या युवतींना करायचा टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

मुंबई असाे वा पुणे, नाशिक असाे अथवा नागपूर महिला आणि युवतींसाठी रस्त्यांवरून बिनधास्त फिरणे धाेक्याचे ठरत आहे. अनेक विकृत मागावर असतातच. कधी काय हाेईल याचा नेम नाही. नागपुरातील कित्येक युवती आणि महिलांना अशाच एका विकृताचा सामना करावा लागला.

नागपूर: रस्त्याने एकट्या-दुकट्या फिरणाऱ्या युवती-महिलांच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या विकृताला जेरबंद करण्यात अंबाझरी पोलिसांना यश आले आहे. जिन्स, टी-शर्टवर असणाऱ्या युवतींना तो प्रामुख्याने टार्गेट करायचा. गेल्या दहा महिन्यांमध्ये सुमारे 50 युवतींचा विनयभंग केल्याची या विकृताने दिली आहे.

  विजय दुधाराम मेश्राम (32, रा. महादेवनगर, लावा, वाडी) असे बेडया ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूर शहरातील एमआयडीसीच्या मागचा परिसर, जयताळा, प्रतापनगर, शंकरनगर, वोक्‍हार्ट हॉस्पिटल परिसर, आठ रस्ता चौक, भरतनगर, रामनगर या भागांतील कमी गर्दी असणाऱ्या रस्त्यांवर हा विकृत घात लावून बसत असे. या रस्त्यांनी तो सायंकाळी सात ते रात्री दहादरम्यान दुचाकीने फिरायचा.

वाचा- नागपूर ब्रेकिंग : धंतोली, बजाजनगरात आढळला कोरोनाबाधित, एकाच दिवशी 56

मोकळे, रूंद आणि कमी गर्दी असणाऱ्या रस्त्यात महिला, मुली, युवती दिसताच तो त्यांच्यावर झेप घेऊन असभ्य वर्तण करायचा. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे युवती, महिला प्रचंड घाबरायच्या. आणि कुणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काही कळण्याच्या आतच विजय मेश्राम मोटारसायकलवरून फरार व्हायचा.

बदनामीच्या भीतीने महिला, युवती तक्रार करीत नव्हत्या अथवा टाळत होत्या. बुधवारी रात्री अंबाझरी हद्दीतील 20 वर्षीय युवती आपल्या भावासोबत घराजवळच रस्त्याने फेरफटका मारत होती. एवढयात हा विकृत तेथे धडकला आणि तिचा विनयभंग करून पळून गेला. युवतीच्या भावाने पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. पण, उपयोग झाला नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने पुन्हा एका युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार येताच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आणि चार तासांच्या आतच त्याच्या मुसक्‍या आवळल्या.

महिलांची पोलिस ठाण्यावर धडक

विनयभंग करणारा आरोपी पोलिसांना गवसल्याची माहिती मिळताच परिसरातील महिला मोठ्या संख्येने अंबाझरी ठाण्यात पोहोचल्या. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी सुरू केली. आपल्यासोबतही आरोपीने विकृत प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कशीबशी समजूत काढत महिलांना शांत करून परत पाठवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eveteaser grilled by police in Nagpur