उत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका

नीलेश डोये
Monday, 28 September 2020

शासनाला सर्वाधिक उत्पन्‍न उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त होते. त्यामुळेच शासनाने सर्वात प्रथम मद्य विक्री करण्याला मंजुरी दिली. गेल्या चार महिन्यात शेकडो कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत आला

नागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या सूचना विविध विभागांना केल्या. कोरोना काळातही उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला असून महिन्याभरात १६२ गुन्हे दाखल करीत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

कोरोनामुळे अनेक लॉकडाउन करण्यात आले. यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, शासकीय आस्थापना बंद होत्या. याचा परिणाम शासनाच्या महसुलावर झाला. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पालाच ६७ टक्क्यांची कात्री लावावी लागली. आतापर्यंतची सर्वात मोठी कट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाने महसूल वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. महसूल देणाऱ्या सर्वच विभागांना त्याच्या सूचना देण्यात आल्या.

अजब शासन गजब निर्णय! खरेदी - विक्रीवर दोन तर हक्क सोडण्यासाठी चार टक्के मुद्रांक शुल्क

शासनाला सर्वाधिक उत्पन्‍न उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त होते. त्यामुळेच शासनाने सर्वात प्रथम मद्य विक्री करण्याला मंजुरी दिली. गेल्या चार महिन्यात शेकडो कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत आला. कोरोना काळात नागपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका विभागाकडून लावण्यात आला. सप्टेंबर महिन्यात १६२ गुन्हे दाखबल करण्यात आले. यात १३३ आरोपींना अटक करण्यात आली असून १२ वाहन जप्त करण्यात आले. तर १७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

नियमांचा भंग करण्यावर कारवाई
विभागाकडून दुकानांची नियमित तपासणी सुरू आहे. नियमांचा भंग करण्यावर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारला १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ८५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला. असे असतानाही अधिकारी, कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत आहेत.
प्रमोद सोनोने, अधीक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Of the Excise Department Crash of action during the Corona period