esakal | व्हीसीए सिव्हिल लाइन्स झाले फडकर-गुजर यांच्या विक्रमी त्रिशतकी भागीदारीचे साक्षीदार

बोलून बातमी शोधा

समीर गुजर व सुहास फडकर

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर १९८८ च्या मोसमात विदर्भाचे सुहास फडकर आणि समीर गुजर यांनी उत्तर प्रदेशविरुद्ध पाचव्या गड्यासाठी विक्रमी त्रिशतकी भागीदारी केली. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. विदर्भाच्या गाजलेल्या सामन्यांपैकी हा एक सामना. त्यामुळे एक गाजलेला सामना या मालिकेत आज या सामन्याविषयी...

 

व्हीसीए सिव्हिल लाइन्स झाले फडकर-गुजर यांच्या विक्रमी त्रिशतकी भागीदारीचे साक्षीदार
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : उत्तर प्रदेश संघाला नव्वदच्या दशकात पराभूत करणे फारच कठीण काम होते. त्या काळात उत्तर प्रदेश मध्य विभाग रणजी करंडकात अजेय संघ म्हणून गणला जात होता. मात्र, ती किमया कर्णधार सुहास फडकर यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ रणजी संघाने 32 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर करून दाखविली होती. स्वतः फडकर यांनी विक्रमी द्विशतक व समीर गुजरसोबत त्रिशतकी भागीदारी रचून विजयात निर्णायक योगदान दिले होते.


विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर नोव्हेंबर 1988 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कसोटीपटू गोपाल शर्मा, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, ज्ञानेंद्र पांडे, राहुल सप्रू, आर. पी. सिंगसारखे "मॅचविनर' असल्याने उत्तर प्रदेशचे पारडे जड वाटत होते. त्या तुलनेत यजमान विदर्भ संघ काहीसा कमकुवत होता. पण, खेळाडूंमध्ये एकजूटता होती, एकमेकांवर विश्वास होता. त्यामुळे कर्णधार फडकर, राजू पनकुले, समीर गुजर, हेमंत वसू, प्रवीण हिंगणीकर, प्रशांत वैद्य व युवा प्रीतम गंधेकडून खूप अपेक्षा होत्या. "स्पोर्टिंग विकेट'वर उत्तर प्रदेशने नाणेफेकीचा कौल मिळवून विदर्भाला फलंदाजीस पाचारण केले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने सामन्याचा निकाल पहिल्या डावाच्या आघाडीवर लागेल, हे निश्‍चित होते. त्यामुळे पहिल्या डावात जास्तीतजास्त धावा काढण्यावर विदर्भाचा मुख्यत्वे भर होता. या परीक्षेत विदर्भाचे फलंदाज शंभर टक्के यशस्वी ठरलेत.

वाचा - अकोलेकरांनी ३७ वर्षांपूर्वी प्रथमच अनुभवला रणजी सामन्याचा थरार

विदर्भाची सुरुवात थोडीशी डळमळीतच झाली. फलकावर शंभर धावा लागेपर्यंत आघाडीचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची सर्व जबाबदारी पुन्हा एकदा भरवशाच्या फडकर यांच्यावर येऊन पडली. फडकर त्या काळात नेहमीच संघासाठी तारणहार बनून आले. सुदैवाने त्यांना गुजर यांची मोलाची साथ लाभली. दोघांनी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीची पिसे काढत पाचव्या गड्यासाठी विक्रमी 315 धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. फडकर यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना 203 धावा फटकावल्या, तर दुसरे शतकवीर गुजर यांनी 115 धावांचे योगदान दिले. प्रशांत वैद्य यांनीही चौफेर बॅट फिरवून 44 धावांची वेगवान खेळी करत विदर्भाला पाचशेच्या (सर्वबाद 499) जवळपास पोहोचविले.

आणखी वाचा - विदर्भाने 37 वर्षांपूर्वी उदयपूरमध्ये केले होते राजस्थानचे गर्वहरण

गोलंदाजांनीही केली कमाल
विदर्भाने पाचशे धावांचा डोंगर उभारून अर्धीअधिक लढाई जिंकली होती. आता सर्व मदार गोलंदाजांवर होती. तसेही पाठीशी भक्कम धावसंख्या राहिल्यास गोलंदाजांचे काम हलके होऊन जाते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्तर प्रदेशला 355 धावांत गुंडाळून 144 धावांची निर्णायक आघाडी घेतली. फिरकीपटू वसू यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी तीन बळी टिपून विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. सामना पूर्णपणे खिशात आल्याने विदर्भाने त्यानंतर 1 बाद 49 धावांवर घोषित करून थोडी "एक्‍साईटमेंट' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळेअभावी 194 धावांचे लक्ष्य उत्तर प्रदेशला गाठता आले नाही. उत्तर प्रदेशची 4 बाद 82 अशी स्थिती असताना पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला आणि व्हीसीएवर विजयाचा जल्लोष झाला. विजयाचे शिल्पकार फडकर यांनी हा सामना त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून, एका चांगल्या लढतीचा साक्षीदार राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तीन दशकांचा काळ लोटूनही त्रिशतकी भागीदारीचा "तो' विक्रम आजही अबाधित आहे.