फडणवीस म्हणाले, जम्बो नव्हे, तर लहान रुग्णालयांवर भर द्या 

राजेश प्रायकर
Tuesday, 22 September 2020

पुढील काही दिवसांत आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांना उपचार मिळवून देणे, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर सर्व बाबींचे व्यवस्थापन कसे करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करीत फडणवीस यांनी कोविडसंदर्भात आणखी सुधारणा करण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महापालिकेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

नागपूर : जास्त बेडच्या ‘जम्बो हॉस्पिटल’मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनेक अडचणी येतात. त्यामुळे शहरात जम्बो हॉस्पिटलऐवजी २०० ते ३०० बेड्सची छोटी रुग्णालये उभारा, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना आज केली.

पुढील काही दिवसांत आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांना उपचार मिळवून देणे, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर सर्व बाबींचे व्यवस्थापन कसे करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करीत फडणवीस यांनी कोविडसंदर्भात आणखी सुधारणा करण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महापालिकेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

या वेळी फडणवीस यांनी एकाच वेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बेड्सचे जम्बो हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी छोटी रुग्णालये तयार करा. यासाठी शहरातील काही रिकाम्या इमारतींचा वापर करा. त्यामुळे झटपट कार्यवाही सुरू होईल, असेही फडणवीस म्हणाले.

ऑक्सिजन दरवाढीचा खाजगी हॉस्पिटल्सचा कांगावा

चाचण्यांची संख्या, बेड्सची उपलब्धता, रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर आणि इतर बाबी समाधानकारक असल्याची पावती त्यांनी दिली. या वेळी आयुक्तांनी शहरात ४२ खासगी कोविड रुग्णालये असून त्यात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय खासगी रुग्णालयाचे बिल तपासणीसाठी अंकेक्षकाची नियुक्ती, ६५ ॲम्बुलन्स, साडेसहा ते सात हजार चाचण्या, अडीचशे डॉक्टरांची लवकरच नियुक्ती, सप्टेंबरअखेरीस मनपा रुग्णालयांमध्ये ४०० बेड्सची उपलब्धता आदी माहितीही आयुक्तांनी दिली.

 बेड्सच्या उपलब्धतेचे ‘एसएमएस’ पाठवा
रुग्णाने नियंत्रण कक्षात फोन करताच त्याची संपूर्ण माहिती मागवून घेणे, त्यानंतर त्याची ऑक्सिजनची स्थिती विचारणे, संबंधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असल्यास त्याला बेड्स उपलब्ध असणाऱ्या संबंधित रुग्णालयाची माहिती देणे व लगेच त्यासंबंधी रुग्णाच्या मोबाईल नंबरवर त्यासंबंधीचे एसएमएस पाठवायचे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. हे एसएमएस हॉस्पिटलमध्ये रुग्णाला तातडीने दाखल करण्यासाठी ‘टोकन’ची भूमिका निभावेल व संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis said, focus on small hospitals, not jumbo