नागपूरकरांनो सावधान! मास्क न वापरल्यास भारावा लागेल दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेले आदेश उद्या, 5 जूनपासून लागू होतील. कोरोनाचा संसर्ग तोंड, नाक आणि डोळ्यांतून जास्त होतो. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक असून मास्क लावणे बंधनकारक आहे.

 नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. एकच व्यक्ती तीनदा मास्कशिवाय आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. 

याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेले आदेश उद्या, 5 जूनपासून लागू होतील. कोरोनाचा संसर्ग तोंड, नाक आणि डोळ्यांतून जास्त होतो. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक असून मास्क लावणे बंधनकारक आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, वाहतूक करताना व इतर ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास संबंधित व्यक्तीकडून 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिले. 

विनामास्क दिसून आल्यास महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, सर्व झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे मनपाचे सर्व अधिकारी, सर्व पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व कार्यालयांमध्ये आस्थापनाप्रमुखांनी प्राधिकृत केलेले अधिकारी व कर्मचारी दंड आकारणार आहेत. 

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू 

शहरातील शासकीय, निमशासकीय, खासगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासीक्षेत्र व संकुले, रेल्वेस्थानके, बसस्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थान, उद्यान, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, जलतरण, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स, आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure to use the mask will result in a fine