'अवनी'ला ठार मारण्याचा कट दोन पशुवैद्यकांचाच, नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल

योगेश बरवड
Friday, 12 February 2021

पशुवैद्यकांनी महाराजबागमधील एका वाघिणीचे मूत्र अवनी वाघिणीच्या क्षेत्रात फवारले. यामुळे ती स्वत:ला व शावकांना असुरक्षित समजू लागली. तेव्हापासून ती एकाच रस्त्यावर दबा धरून राहायची.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-१ (अवनी) या वाघिणीला ठार मारण्याचा कट दोन पशुवैद्यकांचा होता, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध शिकारी शफत अली खान (वय ६३, रा. हैदराबाद ) आणि त्यांचा मुलगा असगर अली खान (वय ४०) यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. 

हेही वाचा - Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता वर्षाला होते पाच कोटींवर उलाढाल

या पशुवैद्यकांनी महाराजबागमधील एका वाघिणीचे मूत्र अवनी वाघिणीच्या क्षेत्रात फवारले. यामुळे ती स्वत:ला व शावकांना असुरक्षित समजू लागली. तेव्हापासून ती एकाच रस्त्यावर दबा धरून राहायची. आम्ही तिला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला. पण, डॉट मारल्यानंतर वाघीण बेशुद्ध व्हायला किमान १० ते १५ मिनिटे लागतात. या दरम्यान ती अधिकच चवताळली व तिने पथकावर हल्ला केला. आम्ही खुल्या जिप्सीत होतो. चालकही घाबरल्याने वाहन रस्त्याखाली उतरले. अवनी ५ ते ७ मीटर अंतरावर असताना स्वत:च्या व पथकातील इतरांचा जीव वाचवण्यासाठी तिला ठार करावे लागले', असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. अवनी वाघिणीने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रांतर्गत १३ जणांचा बळी घेतला. उच्च न्यायालयाने ती वाघीण नरभक्षक असल्यावर शिक्कामोर्तब करून वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न करावेत. त्यात अपयश आल्यास पुढील मनुष्यहानी टाळण्यासाठी ठार मारावे, असे आदेश दिले. तिच्या दोन छाव्यांना बेशुद्ध करून पकडावे व बचाव केंद्रामध्ये पाठवावे असेही आदेशात नमूद केले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१८ रोजी अवनीला ठार मारण्यात आले. 

हेही वाचा - अद्‌भुत कलेने 'त्याला' दिली नवी ओळख, स्प्रे पेटिंगने साकारतो जीवंत चित्रे

दरम्यान, अवनीच्या दोन बछड्यांना पकडून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे; खासगी शिकारी शफत अली खान, असगर अली खान, मुखबिर शेख व पशुवैद्यक अधिकारी डॉ. बी. एम. कडू यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वन्यजीव प्रेमी सरिता सुब्रम्हण्यम यांनी दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आता शिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सदर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिकारींतर्फे अॅड. आदिल मिर्झा, याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर आणि वनविभागातर्फे अॅड. कार्तिक शुकूल यांनी बाजू मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous hunter Shafat Ali khan filed affidavit in high court against veterinarians in avani tigress case