esakal | पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसून ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 

पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र 85 हजार हेक्‍टर नियोजित करण्यात आले असले तरी मागील वर्षीचा कापसाचे उत्पादन पाहता यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसून ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 

कृषी विभागाकडे 27 जूनपर्यंत 200 वर शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यंदा मृग नक्षत्रातच जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने उगवलेले सोयाबीन कोमेजू लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचा तक्रारी वाढत चालल्या आहेत. 

जिल्ह्यात खरिपाची 60 टक्के पेरणी 
यंदा जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही शेतकऱ्यांच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यात यंदा 5 लाख 100 हेक्‍टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 652 हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहे. 

महत्त्वाच्या पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये) 
पीक पेरणी नियोजन 
कपाशी 159111 235000 
धान 9425 95000 
सोयाबीन 76513 85000 
तूर 33277 65000  

कृषी सभापती आपल्या शिवारात या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे तत्काळ पंचनामे करून ते नुकसानभरपाईकरिता महाबीजला पाठविण्यात येत आहे. शासनाने महाबीजला मदतीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. 
-तापेश्‍वर वैद्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद 

सोयाबीनचे 93.05 बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. बियाणे तक्रार निवारण समितीकडून तपासणी सुरू आहे. 
-मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक