माकड दोन दिवस होते विहिरीत पडून; शेतकऱ्याने घातले खाऊपिऊ... वाचा पुढे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राठोड व त्यांच्या चमूने सदर शेत गाठले. लाकडी शिडी व दोरीच्या मदतीने माकडाला बाहेर काढले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याला जंगलात सोडून देण्यात आले.

दारव्हा (यवतमाळ) : सध्या नवतपा सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्याने मनुष्य, प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जंगलांतील पाण्याचे स्रोत आटत चालल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष किंवा प्राण्यांच्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना दारव्हा तालुक्‍याच्या खोपडी शिवारातील दारव्हा-खोपडी मार्गालगत असलेल्या शेतात घडली. पाण्याने व्याकूळ झालेले एक माकड शेतातील विहिरीत पडले. ही बाब शेतमालकाच्या लक्षात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे शेवटी त्या माकडाचे प्राण वाचले. 

दारव्हा तालुक्‍याच्या खोपडी शिवारात दारव्हा-खोपडी मार्गालगत असलेल्या पुरुषोत्तम ताजणे यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी माकड पडले होते. ते माकड विहिरीतून काढण्याचा त्या शेतकऱ्याने खूप प्रयत्न केले; परंतु माकडास बाहेर काढता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवस सदर माकडाला विहिरीतच खाऊ-पिऊ घातले. शेवटी त्यांनी येथील सेनेचे शहराध्यक्ष राजू दुधे यांच्या कानावर सदर बाब घातली. राजू दुधे यांनी क्षणाचाही विलंब न लावता येथील वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन चेहारे यांना माहिती दिली. 

हेही वाचा : टोळधाड आल्याचे समजताच गृहमंत्री रात्रीच शेतकऱ्यांच्या बांधावर

वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राठोड व त्यांच्या चमूने सदर शेत गाठले. लाकडी शिडी व दोरीच्या मदतीने माकडाला बाहेर काढले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याला जंगलात सोडून देण्यात आले. शेतकऱ्याची सतर्कता, मुक्‍या प्राण्याप्रति असलेला शेतकऱ्याचा लगाव, सोबतीला सेनेचे शहराध्यक्ष यांचे सहकार्य व प्रत्यक्ष वन विभागाची कृती या सर्वांच्या प्रयत्नातून अखेर त्या माकडाचे प्राण वाचवण्यात यश आले. वन्यप्रेमींनी याबाबत आनंद व्यक्त केला. सर्वांचे आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer saved the monkeys life