Video : शेतकरी आष्टणकर यांचा मंत्र; ‘पिकते ते विकण्यापेक्षा, जे विकते ते पिकवा’, वांगी उत्पादनातून साधली उन्नती

रवींद्र कुंभारे
Sunday, 24 January 2021

कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारा मोठा मुलगा सचिन आणि ऑटोमोबाईलचे शिक्षण घेणारा लहान मुलगा पंकज यांची शिक्षणासोबतच शेतीमध्ये गोडी असल्याने प्रभाकर आष्टनकर यांची ताकद वाढलेली आहे.

गुमगाव (जि. नागपूर) : सध्या शेतकरी सर्वच बाजूने उदासीन झाला आहे. घाम गाळून पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत गुमगाव येथील ४७ वर्षीय प्रगतिशील शेतकरी प्रभाकर आष्टनकर यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत दोन एकर शेतात वांगीची लागवड केली. वांगी पिकाची लागवड त्यांना लाखमोलाची ठरली आहे. त्यांचा हा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील प्रभाकर दौलत आष्टनकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. ‘पिकते ते विकण्यापेक्षा, जे विकते ते पिकवायचे’ असा मूलमंत्र मनाशी बाळगून त्यांनी दोन एकर शेतीमध्ये वांगीची लागवड केली.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

लागवडीनंतर योग्य पाणी व्यवस्थापन, प्रभावी तणनियंत्रण, कीड रोगासाठी वेळेत फवारणी, थंडीच्या काळात योग्य काळजी करीत वांगीचे व्यवस्थापन केले. सध्या तोडणीला सुरुवात झालेल्या वांगीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने वांगी लागवड आष्टनकर यांना लाखमोलाची ठरत आहे.

फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आष्टनकर यांनी पीक बदल केला. कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारा मोठा मुलगा सचिन आणि ऑटोमोबाईलचे शिक्षण घेणारा लहान मुलगा पंकज यांची शिक्षणासोबतच शेतीमध्ये गोडी असल्याने प्रभाकर आष्टनकर यांची ताकद वाढलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांना आज फायदेशीर ठरत आहे.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

२५ टनापर्यंत वाढले उत्पादन

एखादी नोकरी करावी, अशा प्रकारे प्रभाकर आष्टनकर शेतीकडे लक्ष देतात. दोन्ही मुलांसह खत, पाणी पिकाला देतात. किड-रोगांकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे वांग्याचा दर्जा सुधारला आहे. सध्या वांगीचे पाच तोडे झाले असून, सुरुवातीला २० ते २२ रुपये आणि सध्या १० ते १२ रुपये प्रती किलो वांगीला बाजारभाव मिळालेला आहे. त्यांना आतापर्यंत २५ टनापर्यंत वांग्याचे उत्पादन झाले आहे. अजून या पिकातून त्यांना ४५ ते ५० टन वांग्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers achieve economic prosperity through production