'शेतात पिकलं तर आमच्या पोटात जाईल, पण संपूर्ण पीकच पाण्यात गेलं तर जगून करायचं काय?'

farmers agitation for the demand to reduce khindsi lake water level in ramtek of nagpur
farmers agitation for the demand to reduce khindsi lake water level in ramtek of nagpur

शिवनी (जि. नागपूर): पावसाळा संपून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पाणीच पाणी आहे. खिंडसी तलावाचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. जलाशयाची पाणी पातळी कमी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खिंडसी तलावात जलसमाधी आंदोलन केले. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास याच ठिकाणी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. 

रामटेक येथील शेतकरी पैसे भरून खिंडसी तलाव परिसरातील जमीन लिलावात घेतात. त्याठिकाणी शेती करतात. येथे प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. मात्र, यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शेतामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सध्या तिथे शेती करणे कठीण झाले आहे. खिंडसी तलावातील शेतजमीन लिलावात घेऊन 500 शेतकरी शेती करतात. मात्र, तलावातील पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने शेती क्षेत्र पाण्यात बुडाले आहे. या जमितीतून पीक घेत उदरनिर्वाह करणारे परीसरातील 25 गावातील शेतकरी संकटात आहेत. 'जगावे की मरावे' हा एकच प्रश्न आमच्यासमोर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने तत्काळ तलावातील पाणी कमी करून शेत जमिनी पिकांसाठी मोकळ्या कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर खिंडसीच्या तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

सोमवारी अकरा वाजेपासून आंदोलन सुरू झाले. परंतु, एकही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यामध्ये नाराजी दिसून आली. आंदोलनामध्ये १५० ते २०० शेतकरी सहभागी झाले होते. बऱ्याच वेळेनंतर एक वाजता रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, ठाणेदार ठाकूर, पटवारी निखाडे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली व काही उपाययोजनेचे आश्वासन देऊन मंगळवारी (ता. ३) तहसील कार्यालय रामटेकला शेतकरी प्रतिनिधी आणि पेंच पाटबंधारे विभाग यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन दोन वाजता समाप्त करण्यात आले. आंदोलनात नकुल बरबटे, गिरीधर पानसे, शंकर देशमुख, देवा डोंगरे, नितीन चांदेकर, नारायण महाजन, कवडू नवघरे, कवडू डडूरे, दिलीप मानकर, इंद्रपाल मोहणे, राजू हिवरकर, बाळू बदन, संतोष डोहाडे, गजानन मौतकर, मूलचंद येलमुले, बाळा बागडे व इतर दोनशे शेतकरी सहभागी झाले होते. 

हा विषय पाटबंधारे विभागाचा असल्यामुळे मी त्यांना दूरध्वनीद्वारे बोललो. परंतु, त्यांची अतिमहत्त्वाची बैठक असल्याने मला तालुका दंडाधिकारी या नात्याने कायदा व सुव्यवस्थेकडे बघावे लागते. म्हणून मी उपस्थिती दर्शवली. 
- बाळासाहेब मस्के, तहसीलदार, रामटेक 

तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाशी चर्चा करून शेतकरी, त्यांचे प्रतिनिधी व पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करून तहसील कार्यालयात बोलाविले. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. 
-नकुल बरबटे,  शेतकरी, गटनेते


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com