शेतकरी म्हणतात, अरे कुठे नेऊन ठेवले भाऊ पांदण रस्ते?

चंद्रकांत श्रीखंडे
Monday, 5 October 2020

आमाले जमिनीची मशागत करण्यापासून ते मालाचा शेवटचा दाणा घरी आणेपर्यंत शेतात ये-जा करावी लागते. ही वहिवाट उपलब्ध पांदण रस्त्यावरून होते. परंतू पावसाळ्यात या पांदण रस्त्यावर पाणी साचून चिखल तयार होतो. चिखलातून साधे पायदळ जायचे असले तरी एक दोन फूट खोल चिखल तुडवीत जावे लागते. शेती अवजारे, बी बियाणे, रासायनिक खते आदी साहित्य डोक्यावर वाहून न्यावे लागते. यामुळे या वस्तू नेण्यात शक्ती खर्च होत असल्याने दिवसभर शेतातील मेहनतीचे कामे करायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो भाऊ, अशी कैफियत एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

कळमेश्वर (जि.नागपूर) : शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे  शासनाच्याग'शेत तिथे पांदण रस्ता' या योजनेचा पार फज्जा उडाला आहे. गेल्या वर्षीपासून पावसाने वर्षभरही उसंत न घेतल्याने त्यात तर आणखीनच भर पडली. आता शेतात जायचे कसे, शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे, असा फार मोठा यक्षप्रश्न समोर उभा आहे. कळमेश्वर तालुक्यातील  पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही.

अधिक वाचाः हिंगणा एमआयडीसीत चालते श्रमिकांच्या घामावर ठेकेदारांची सावकारी

जिल्हा परिषदेने २००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती अंतर्गत २४१ पांदण रस्ते असून त्यांची लांबी ६५९.२० किलोमीटर आहे. तर त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३२४५ लाख रुपयांचा निधी लागणार होता. परंतू पांदण रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर पांदण रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखल्या गेला नसल्याने पांदण रस्त्याची दशा पालटू शकली नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात. तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते उपलब्ध आहेत. परंतू या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी देखील या पांदण रस्त्यांची समस्या निकाली निघू नये, ही खरी शोकांतिका आहे.

 अधिक वाचाः तलावात उडी घेऊन दोन सख्ख्या भावांनी दिले थेट मृत्यूला निमंत्रण
 

  आराखडा कागदोपत्रीच !        
२००७ मध्ये तत्कालीन  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश मानकर यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर २००७ च्या कार्यवृत्त अहवालानुसार नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी योजना राबविण्याचे अनुषंगाने ठराव घेण्यात आला होता. याप्रसंगी मांडलेल्या ठरावानुसार जिल्ह्यात पांदण रस्त्याची एकूण संख्या ४४३० असून पांदणीची एकूण लांबी ९४६६.५५५ किलोमीटर असून या पांदणीच्या माती कामास व खडीकरणास लागणारा अंदाजे खर्च ७०४३६.७५ लाख खर्च येणार होता. हा ठराव पास करून शासनाकडे निधीची तरतूद करावी, यासाठी शिफारसही करण्यात आली होती. परंतू निधी उपलब्ध न झाल्याने हा पांदण रस्त्याचा आराखडा कागदोपत्रीच राहिला, हे विशेष.

अधिक वाचाः आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का?
 

तहसील कार्यालयाला दिले पत्र
 विविध योजनांच्या अभिसरणमधून पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तालुक्यातील ९ पांदण रस्त्याच्या बाबत आराखडा तयार करण्यासाठी हे रस्ते अतिक्रमणमुक्त करून भूमिअभिलेख विभागाकडून तातडीची मोजणी करून मोक्यावर खुणा निश्चित करण्यात याव्या व महसूल नियमाचा अवलंब करून पांदण अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून त्याबाबत योग्य कारवाई सुरू आहे, अशी माहिती आहे.
        
संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers say, where did you take the roads?