वर्षभरापूर्वी आईचा मृत्यू आता वडिलांनी सोडले जग अन् तीन मुले झाली अनाथ, वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कुणाच्या जीवनात कुठला वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. अशीच एक वेदना देणारी घटना रविवारी नागपुरात घडली. ट्रकचालकाच्या बेदरकार वृत्तीमुळे एका गरीब कुटूंबावर संकटाची कुराड कोसळली आहे.

नागपूर : भरधाव ट्रकने एका सायकलस्वार मजुराला जबर धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने मजुराचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. मृतक नवीननगर पारडी निवासी शंकर करबू ठाकूर (55) आहेत.

शंकर ठाकूर हे मोलमजुरी करीत होते. रविवारी सकाळी भंडारा मार्गावर बाराद्वारी चौकात रस्ता ओलांडताना नागपूरवरून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या ट्रक क्र. टी.एन.67-ए.बी.9597 च्या चालकाने त्यांच्या सायकलला धडक दिली. शंकर ट्रकखाली आले आणि बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेले. मागच्या चाकात आल्याने चिरडल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. शंकरला 2 मुली आणि एक मुलगा आहे. पोलिसांनी ट्रकचालक अशोकनगर, चेन्नई निवासी विलत्तस्वामी रेड्डीआर (70) विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

वाचा- वादळी पावसाने दाणादाण उडवली

तीन मुलांचे छत्र हरविले
शंकर ठाकूर आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून दोन मुली आणि एका मुलाचा सांभाळ करीत होते. वर्षाभरापूर्वी आजारामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तीनही मुलांच्या आई होण्याची जबाबदारी शंकर हे व्यवस्थित पार पाडत होते. अतिशय आर्थिक स्थितीने पिचलेल्या शंकर यांचाही आता अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे तिन्ही मुलांवरून आईवडिलांचे छत्र हरपले आहे. वडिलावर अंत्यसंस्कार करण्याचीही स्थिती मुलांची नसल्याचे पोलिसांसमोर मोठा प्रश्‍न पडला आहे.

कारच्या धडकेत 1 ठार

यशोधरानगर ठाण्यांतर्गत दुसऱ्या अपघातात कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक संघर्षनगर निवासी गयासुद्दीन अंसारी (59) आहेत. अंसारी शनिवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास दुचाकीने टेकानाकाकडे जात होते. रिंगरोडवर एकतानगर मैदानाजवळ कार क्र. एम.एच.46-एक्‍स.3487 च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यशोधरानगर पोलिस घटनास्थळावर पोहोचले आणि अंसारी यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती केले. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fatal accident turned the life of family into distress