चिमुकलीच्या दुर्धर आजाराने पिता झालाय हतबल, केले मदतीचे आवाहन

नरेंद्र चोरे
Sunday, 11 October 2020

तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पित्याची धडपड सुरू आहे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही.

 
नागपूर : खेळण्याबागडण्याच्या वयात तिला कॅन्सरसारख्या दुर्धर व जीवघेण्या आजाराने घेरले. ही धक्कादायक बातमी ऐकून बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या उपचारावर आतापर्यंत पाच ते सात लाखांचा खर्च झाला असून, आणखी तेवढ्याच पैशाची गरज आहे. वडील मेकॅनिक व पेपरविक्रेते असल्यामुळे एवढा खर्च करण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून मुलीला जीवनदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

 

तन्वी रसिकलाल मलमकर असे आयुष्याची लढाई लढत असलेल्या या चिमुकलीचे नाव. दिघोरी परिसरातील राऊतनगरात राहणाऱ्या राऊत परिवाराची ती एकुलती एक कन्या. गेल्या जानेवारीत तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तन्वीच्या वडिलांचे मेडिकल चौकात पार्टनरशिपमध्ये दुचाकी वाहन दुरुस्तीचे छोटेसे दुकान आहे. एवढ्याशा कमाईत भागत नसल्याने ते सकाळच्या वेळेत दोन तास पेपर विकण्याचे काम करतात. कोरोनाने अडचणीत आणखीनच भर घातली. तन्वीची आई गृहिणी आहे. 

 

हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*

 

सहा वर्षांच्या तन्वीवर सध्या सेंट्रल बाजार रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विदर्भ बुनियादी शाळेत शिकणाऱ्या तन्वीला दररोज तीन हजारांचे इंजेक्शन व किमो नियमित द्यावे लागत आहे. तिच्यावर नुकतीच बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व नातेवाइकांनी थोडीफार मदत केली. शिवाय, कर्जही काढावे लागले. तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पित्याची धडपड सुरू आहे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. या अडचणीच्या काळात समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे भावनिक आवाहन तन्वीच्या वडिलांनी ‘सकाळ’मार्फत नागरिकांना केले आहे. 

 
नागरिकांना आवाहन 

इच्छुक दानशूर व्यक्तींना तन्वीला मदत करावयाची असेल, त्यांनी रसिकलाल मलमकर यांच्याशी 8208999893 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. अलाहाबाद बँकेच्या हुडकेश्वर शाखेत त्यांचे खाते असून, खाते क्रमांक 50292464852 तर IFSC-ALLA0213185 कोड आहे. 

संपादन : मेघराज मेश्राम
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Appeal for Help to His Cancer Child