ज्येष्ठांमध्ये नैराश्‍याची भावना; ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

  सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या आणि गोळा केलेल्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजावर पुढील जीवन जगणे सुरू होते. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि अर्थव्यवस्थेचा आलेख तळाला जाऊ लागला. त्याला सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेच्या व्याजाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय ज्येष्ठांच्या अंगाशी आला. 

नागपूर : सेवानिवृत्तीनंतर समाधानकारक जगता यावे म्हणून पोटाला चिमटा काढून बॅंकेत पुंजी जमा केली. त्यातून येणाऱ्या व्याजावर ज्येष्ठांची दिनचर्या चालू होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाचा विकासदर उणे राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने वर्तविला. त्यामुळे व्याजदर कमी केले. परिणामी, राष्ट्रीयीकृत बॅंक खात्यातील गुंतवणुकीवरील व्याजदरात मोठी कपात झाल्याने समाधानकारक व्याज मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये नैराश्‍याची भावना आहे. 

22 मार्चपासून देशपातळीवर लॉकडाउन झाले अन्‌ अवघे उद्योग क्षेत्र थांबले. त्याची झळ केवळ मोठ्या उद्योगांना नव्हे तर छोट्या व्यावसायिकांना बसली. त्यातच केंद्र सरकारने सर्वच शासकीय गुंतवणुकीवरील व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात केली. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांसह इतर बॅंकांमधील व्याजदरात घट झाली. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या आणि गोळा केलेल्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजावर पुढील जीवन जगणे सुरू होते. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि अर्थव्यवस्थेचा आलेख तळाला जाऊ लागला. त्याला सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेच्या व्याजाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय ज्येष्ठांच्या अंगाशी आला. 

हेही वाचा : रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले; मग त्या मुलींनी घेतला हा निर्णय...

गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांचा ओढा राष्ट्रीयीकृत बॅंकांसोबतच टपाल खात्यातील गुंतवणुकीकडे आहे. मात्र, ढासळत्या व्याजदराचा फटका या खात्याच्या गुंतवणुकीला बसला. सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिकरिंग डिपॉझिटवरील (आर.डी.) व्याजदरातच मोठी घट झाली. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्‍न ज्येष्ठांना पडला आहे. 

टपाल खात्यातील प्रचलित व्याजदर (1 एप्रिलपासून)- 
1) रिकरिंग डिपॉझिट- 5. 8 टक्के 
2) मासिक प्राप्ती योजना- 6.6 
3) पाच वर्षीय टाईम डिपॉझिट- 6.7 
4) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- 6.8 
5) किसान विकास पत्रे- 6.9 
6) पीपीएफ- 7.1 

राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील सरासरी व्याजदर- 
1) मुदत ठेव- 5.5 टक्के 
2) बचत खाते- 3.3 टक्के 
3) चालू खाते- व्याज नाही. 
ज्येष्ठ नागरिक- 8.5 

सहकारी बॅंकांमधील सरासरी व्याजदर- 
1) सेव्हिंग- 4 टक्के 
2) मुदत ठेव- 7.25 टक्के 
3) ज्येष्ठांसाठी- 7.75 टक्के 
 

सेवानिवृत्तीनंतर बॅंकेतील ठेवीतून मिळणाऱ्या व्याजावर दिनचर्या चालविणारे ज्येष्ठ नागरिक व्याजदर कमी झाल्याने अडचणीत सापडले आहेत. सेवानिवृत्तांनी पुढील जीवन कसे जगावे, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळल्याने व्याजाचे दर कमी केले. हे मान्य आहे. मात्र, सेवानिवृत्तीनंतर आरोग्य समस्यांसह दिनचर्या केलेल्या गुंतवणुकीतून पूर्ण करता येत नसेल तर ठेवी काय कामाच्या. 
-विजय काटे, अध्यक्ष, दक्षिण-पश्‍चिम ज्येष्ठ नागरिक संघ, नागपूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feelinfs of depression in seniors citizen