एकाशी झाली बोलनी अन्‌ दुसरा म्हणाला बस माझ्या ऑटोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

कॅबसेवेचा थेट परिणाम ऑटो व्यवसायावर झाला आहे. पुरेसा व्यवसाय होत नसल्याने प्रवाशांसाठी ओढाताण करावी लागते. त्यातूनच नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांमध्ये हमरीतुमरी आता नित्याचीच बाब झाली आहे. शुक्रवारी प्रकरण ऑटोच्या तोडफोडीपर्यंत गेले होते.

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी ओला, उबेर सारखे प्रवाशी वाहतूक कॅबसेवा दाखल झाल्या आहेत. ऍपद्वारे ऑनलाईन गाडी बूक करता येते. तसेच नमुद ठिकाणी जाण्यासाठी किती भाडे लागणार याची अगोदरच माहिती मिळत असल्याने प्रवाशांचीही याला मोठी पसंती मिळत आहे. दुसरीकडे याच ऑनलाईन सेवेमुळे ऑटो, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रवासी आपल्याच गाडीत बसावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रवाशाला आपल्याच गाडीत बसविण्यासाठी दोन ऑटो चालकांमध्ये सोमवारी चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 

कॅबसेवेचा थेट परिणाम ऑटो व्यवसायावर झाला आहे. पुरेसा व्यवसाय होत नसल्याने प्रवाशांसाठी ओढाताण करावी लागते. त्यातूनच नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांमध्ये हमरीतुमरी आता नित्याचीच बाब झाली आहे. शुक्रवारी प्रकरण ऑटोच्या तोडफोडीपर्यंत गेले होते. सोमवारी पुन्हा दोन ऑटोचालकांमध्ये तुफान राडा झाला. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. 

अधिक वाचा - मैत्रिणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन्‌ निघाल्या तलवारी, वाचा काय झाले...

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रीपेड ऑटो बूथ आहे. रेल्वेस्थानकाबाहेरही ऑटोचालक सवारीच्या शोधात उभे असतात. त्यातच आता खासगी कॅब कंपन्यांची भर पडली आहे. या सर्व प्रकाराने सर्वांच्याच व्यवसायावर परिणाम झाला आहे. सवारीच्या शोधात वाद होण्याची घटना नित्याचीच आहे. सोमवारी सायंकाळी एका ऑटोचालकाने प्रवाशासोबत बोलणी केली. तो ऑटो आणण्यासाठी बाहेर जाताच दुसऱ्या ऑटोचालकाने कमी दरात पोहोचवून देण्याची तयारी दर्शविली. यावरून दोन्ही चालकांमध्ये चांगलाच वाद रंगला. प्रकरण वाढत असतानाच अन्य ऑटोचालकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. 

घटनांकडे सर्रास डोळेझाक

शुक्रवारीसुद्धा अशाच प्रकारे दोन ऑटोचालकांमध्ये वाद झाला होता. त्यातून ऑटोची तोडफोड आणि पळापळ झाली होती. हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणा मात्र या घटनांकडे सर्रास डोळेझाक करीत आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून आरपीएफला बारीकसारीक सर्वच हालचाली दिसतात. मात्र, ऑटोचालकांमधील वाद का दिसत नाही, असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करीत आहेत. अशा वादंगामुळे रेल्वेचीच प्रतिमा डागाळते. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून वाद करणाऱ्यांना हुसकावून लावावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between auto drivers