जुन्यांचा जमणार पुन्हा मेळ, आता विदर्भातही होणार चित्रपट समीक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

विदर्भात चित्रपटांचे समीक्षण कसे लिहावे याची कार्यशाळा होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे एकाने जब्बार पटेल यांना सांगितल होते. त्यानंतर डॉ. पटेलांनी भविष्यात वैदर्भीय चित्रपट समीक्षकांसाठी समीक्षणाची कार्यशाळा आयोजित होऊ शकते असे सांगितले आहे.

नागपूर : वैदर्भीय चित्रपट समीक्षकांसाठी भविष्यात कार्यशाळा भरविण्यात येणार असून, नवोदित लेखक, समीक्षकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासंदर्भात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी संकेत दिले असून, या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक जुने जाणते वैदर्भीय चित्रपट समीक्षक पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यता आहे.

आरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन व महापालिकेच्या संयुक्‍त विद्यमाने झालेल्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी डॉ. जब्बार पटेल बोलत होते. विशेष म्हणजे ते स्वत: या आयोजनासाठी तीन दिवस शहरात होते. आयोजकांनी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या उपक्रमांमधील किती उपक्रमांचे आयोजन केले असा प्रश्‍न पत्रकारांनी जब्बार पटेल यांना फावल्यावेळेत विचारला होता. याची माहिती देताना जब्बार पटेल यांनी भविष्यात काही उपक्रम घेण्याची गरज असेल तर सुचवा असे विचारले होते. याच चर्चेत विदर्भात चित्रपटांचे समीक्षण कसे लिहावे याची कार्यशाळा होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे एकाने जब्बार पटेल यांना सांगितल होते. त्यानंतर डॉ. पटेलांनी भविष्यात वैदर्भीय चित्रपट समीक्षकांसाठी समीक्षणाची कार्यशाळा आयोजित होऊ शकते असे सांगितले आहे.

सविस्तर वाचा - अपमान सहन न झाल्याने केले असे

मराठी साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण या क्षेत्रातील नवोदितांनी कसे करावे. संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, तुलनात्मक लिखाण करताना स्वतःचे मत व्यक्त व्हावे असे स्पष्टीकरण कसे लिहावे, एखाद्या विषयाचे निरूपण कसे करावे अशा विविध मुद्द्यांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकीय स्थितीचे अवलोकन करून त्यावर प्रामाणिक मत नोंदवणे तोंडी प्रत्येकांना शक्‍य असते. मात्र, त्याच भावनांना शब्दांकित करणे अनेकांना कठीण जाते. अथवा अनेकदा शब्दांकन हवे तितके सरस झाल्यागत वाटत नाही. अशा सर्वांसाठीच या कार्यशाळेचे आयोजन मोलाचे ठरणार आहेत. चित्रपट समीक्षणाची तारीख डॉ. पटेलांनी जाहीर केली नसली तरी हे आयोजन सप्टेंबरदरम्यान होऊ शकते असे सूतोवाच त्यांनी समारोपप्रसंगी केला आहे.

सगळ्या विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन
चित्रपट माध्यमातील सर्वच विषयांचे सूक्ष्म निरीक्षण, समीक्षणाच्या दृष्टीने चित्रपट अनुभवण्याची बघण्याची कला, समाजमाध्यमात चित्रटाची होणारी चर्चा अथवा परिणाम, त्याचे दृकश्राव्य, भाषा आणि संवाद असे सगळ्या विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
-समर नखाते, ज्येष्ठ दिग्दर्शक.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film criticism workshop in Vidarbha in next few days