अडीच वर्षानंतर तो पोपटासारखा बोलू लागला

finally he open his mouth
finally he open his mouth

नागपूर : लहान मुले तोतडे बोलू लागले की आई-वडीलांना आनंद होतो. मुलगा किंवा मुलगी अडीच-तीन वर्षाचे झाले की ते बोलायला लागतात. मात्र, एखादा मुलगा आजारामुळे बोलू शकत नसेल तर आई-वडीलांची मानसिक स्थिती काय असेल, याविषयी कल्पना केलेलीच बरी. मात्र, हाच मुलगा अखेर बोलू लागल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

ही कहानी आहे, अमरावतीच्या एका युवकाची. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या निखील गवईच्या जबड्याजवळ दुर्मीळ आजार झाला. त्यामुळे निखीलसह त्याचे कुटूंब चांगलेच चिंतेत पडले. काय करावे, त्यांना सुचत नव्हते. अनेक उपाय करून पाहिले. अखेर वर्धेत पहिली शस्त्रक्रिया केली; परंतु ती अयशस्वी झाली. यामुळे आणखी अडचणीत भर पडली. अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे अडीच वर्षे त्याचे तोंड उघडलेच नाही. नळीद्वारे किंवा चमच्यातून द्रव्य पदार्थ त्याला दिला जात होता. अतिशय वेदना सहन करीत निखिल जगत होता.

कोण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात तो पोहोचला. डॉक्‍टरांनी तपासणी केली आणि शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. हे डॉक्‍टर निखीलसाठी देवदुत ठरले. तीन दिवसांपूर्वीच निखिलवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तब्बल अडीच वर्षांनंतर तोंड उघडले. त्यामुळे सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने सर्वप्रथम सोजी खाल्ली. त्या वेळी येथील वातावरण भारावून गेले. दोन्ही हात जोडून निखिलच्या आईवडिलांनी डॉक्‍टरचे आभार मानले, त्या वेळी साऱ्यांचे डोळे डबडबले.

निखीलने सोजी खाल्ली

शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टरचे नाव डॉ. अभय दातारकर. दंत मुख शल्यचिकित्सा विभागाचे ते प्रमुख आहेत. निखिल उपचारासाठी आला. त्या वेळी बाह्य रुग्ण विभागात डॉ. दातारकर होते. त्यांनी त्याला बघितले आणि उपचार सुरू झाले. निखिलचे वडील हातमजूर आहेत. आई घरकाम करते. एक लहान भाऊ आहे. अडीच वर्षांपूर्वी चेहऱ्यावर सूज आली. काही दिवसांनंतर तोंड उघडणे बंद झाले. सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेतले. तेथे एक शस्त्रक्रिया झाली. पंधरा दिवस त्याचे तोंड उघडले खरे; परंतु पुन्हा तोंड न उघडण्याचा त्रास सुरू झाला. वारंवार उपचाराला गेल्यावरही आराम मिळाला नाही. जगण्यासाठी धडपड सुरू असताना ओठातून चमचा टाकत फळांचा रस घेत होता. डॉ. दातारकर यांनी दंत मुख शल्यचिकित्सा विभागात केलेल्या तपासणीतून "जॉ फ्यूज' हा आजार असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. निखिलवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जबड्यातील एक हाड कायमचे काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी या रुग्णाच्या चेहऱ्यावर लावलेल्या सर्व पट्ट्या काढल्या. अडीच सेंटिमीटर तोंड उघडले. चमच्याने सोजी खाल्ली. निखिलचा आनंद गगनात मावनेसा झाला. त्या युवकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. डॉ. अभय दातारकर यांच्या नेतृत्वात डॉ. सुरेंद्र डावरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. सूरज, डॉ. अमित, डॉ. शमा यांनी मदत केली. भूलतज्ज्ञ डॉ. संजय भुले आणि डॉ. पल्लवी यांचे सहकार्य मिळाले.

हाड काढून टाकले
जबड्याच्या वर असलेले चिक बोन आणि जबडा यांच्यात नको असलेल्या एका हाडाची वाढ झाली. चिक बोनशी जबड्याचे हाड जुळल्याने तोंड उघडणे कठीण झाले. बोलतानाही दबका आवाज निघत होता. यामुळे सरळ बोलत येत नव्हते. चेहऱ्याची ठेवणही बिघडली. यामुळे खालच्या जॉपासून तर चिक बोनपर्यंत जुळलेले हाड काढून टाकले. हा एक दुर्मीळ प्रकारचा आजार आहे. अर्धा सेंटिमीटरही तोंड उघडत नव्हते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा अडीच सेंटिमीटर तोंड उघडले.
-डॉ. अभय दातारकर,
विभागप्रमुख, दंत मुख शल्यचिकित्सा विभाग, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com