माजी सैनिकाच्या स्वप्नाची क्षणात राखरांगोळी; मुलांचे भविष्य आगीत खाक

अनिल कांबळे
Thursday, 8 April 2021

उदरनिर्वाहासाठी घराच्या खाली २०१८ मध्ये ‘आभास सुपर मार्केट’ किराणा आणि जनरल स्टोअर्स थाटले. चार वर्ष सर्वकाही सुरळीत सुरू होते. अंकुश स्वतः आणि पत्नी भारती दोघेही सुपर मार्केटमध्ये कष्ट उपसत होते. 

नागपूर : माजी सैनिकाने सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून किराणा दुकान थाटले. त्यावर उर्वरित आयुष्य आणि मुलांचे भविष्य साकारण्याचे स्वप्न रंगवले. मात्र, नियतीला ते मान्य नसावे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत त्याच्या स्वप्नाची क्षणात राखरांगोळी झाली. दुकान आगीत खाक झाले. हृदयाला हेलावून टाकणारी ही घटना साईनगरात घडली. अंकुश हरीश्‍चंद्र पडोळे असे माजी सैनिकाचे नाव आहे.

वेलतूरजवळ असलेल्या गोन्हा या खेडेगावातील रहिवासी पडोळे. तीन वर्षांचे असताना पितृछत्र हरविले. आईने शेतमजुरी करून सांभाळ केला. माध्यमिक शिक्षण घेतानाच सैन्यात भरती झाले. गावातील अंकुश सैनिक होऊन जम्मू काश्‍मीरमध्ये तैनात असल्याचा गावकऱ्यांनाही आनंद झाला. बर्फाळ प्रदेशात तैनात करून खडतर प्रवास पार केल्यानंतर अंकुश यांनी सैन्यात ज्युनिअर कमिशनर अधिकारी पदावर कार्य केले.

अधिक वाचा - Flat Foot : पाय सपाट असेल तर त्वरित करा उपचार; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

त्यांचे २०११ ला लग्न झाले. पत्नी भारती, मुलगी सिद्धी, मुलगा आभास आणि आई बहिणाबाई यांच्यासोबत दिघोरी नाका, साईनगरात गोन्ही सिम परिसरात राहायला लागले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शासनाकडून मिळालेल्या रकमेतून घर बांधले. उदरनिर्वाहासाठी घराच्या खाली २०१८ मध्ये ‘आभास सुपर मार्केट’ किराणा आणि जनरल स्टोअर्स थाटले. चार वर्ष सर्वकाही सुरळीत सुरू होते. अंकुश स्वतः आणि पत्नी भारती दोघेही सुपर मार्केटमध्ये कष्ट उपसत होते. 

सुपर मार्केटला लागली आग

२७ मार्चला पहाटे तीन वाजताच्या सुमारास सुपर मार्केटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमुळे तेलाचे पीपे फुटल्याचा आवाज आल्याने अंकुश यांची झोप उघडली. ते बाहेर आले असता त्यांना घरामध्ये धूर आणि आगीचे डोंब दिसले. आगीत जवळपास २५ लाखांचा माल जळाला. अंकुश यांच्या भविष्य आणि स्वप्नाची क्षणात राखरांगोळी झाली. लकडगंज आणि सक्करदरा फायर विभागाच्या वाहनांनी पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

मिलिट्रीचे प्रशिक्षण आले कामी

वरच्या माळ्यावर आई, पत्नी आणि दोन्ही मुले झोपलेली होती. खालच्या माळ्यावर आग लागल्याचे लक्षात येताच अंकुश यांनी चौघांनीही घराबाहेर काढण्यासाठी आटापिटा केला. घरात पडलेला जाड दोर खिडकीला बांधला. आईला पाठीला दुपट्‍याने बांधले. दोराने खाली उतरले. त्यानंतर पुन्हा वर चढले. दोन्ही मुलांना पाठीला करकचून बांधले आणि दोराच्या आधाराने खाली उतरले. तिसऱ्यांदा दोराने चढून पत्नीचाही जीव वाचवला. मिलिट्रीचे प्रशिक्षण घेतल्यामुळे चौघांचा जीव वाचवू शकलो, अशी प्रतिक्रिया अंकुश पडोळे यांनी ‘सकाळ’ला दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fire broke out at a grocery shop in Nagpur