महिलांनो नका करू दुर्लक्ष, योग्य वेळी लक्ष दिल्यास बरा होतो कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

भारतात स्तन व मुख कर्करोगानंतर सर्वाधिक रुग्ण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे आहे. जगभरातील रुग्णांपैकी एकट्या भारतात याचे 25 टक्‍के रुग्ण आहेत. अगदी अल्पवयात म्हणजे तिसाव्या वर्षीही हा कर्करोग होऊ शकतो. अतिशय कमी वयात लैंगिक संबंध, रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे दीर्घकाळ सेवन किंवा धूम्रपान ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत.

नागपूर : आज कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे करीत असलेले दुर्लक्ष आहे. योग्य आहार, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली अशी अनेक कारणे या आजारास कारणीभूत ठरतात. दोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग अस्तित्वात आहेत. योग्यवेळी आणि योग्य उपचारांनी गर्भाशयाचा कर्करोग बरा होऊ शकतो, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ माधुरी गावंडे यांनी दिली.

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?
कर्करोगाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारतात स्तन व मुख कर्करोगानंतर सर्वाधिक रुग्ण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे आहे. जगभरातील रुग्णांपैकी एकट्या भारतात याचे 25 टक्‍के रुग्ण आहेत. अगदी अल्पवयात म्हणजे तिसाव्या वर्षीही हा कर्करोग होऊ शकतो. अतिशय कमी वयात लैंगिक संबंध, रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे दीर्घकाळ सेवन किंवा धूम्रपान ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. दोन मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव, योनीमार्गाद्वारे अतिशय व अनावश्‍यक स्त्राव, लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे ही प्रमुख लक्षणे असल्याचे गावंडे यांनी सांगितले.

पॅप चाचणीतून निदान
पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास शस्त्रक्रिया करून पेशी काढल्या जातात किंवा किमोथेरपी व क्ष-किरण (रेडिओथेरपी) वापरून पेशी नष्ट केल्या जातात. पहिल्या टप्प्यात या कर्करोगाचे निदन होत असून, संपूर्ण उपचाराअंती रुग्ण ठणठणीत होतो. उपययोजना म्हणून स्त्रियांनी पंचवीशीनंतर पॅप चाचणी व तिशीनंतर पॅप तसेच एचपीवी चाचणी करणे गरजेचे आहे. सतत तीन वर्षे रिपोर्ट नॉर्मल असल्यास तीन वर्षातून एकदा चाचणी करता येते. विशेष म्हणजे एचपीव्ही विषाणूची लागण होऊ नये यावर लसही उपलब्ध आहे. ही लस 9 ते 25 वर्षे वयोगटातील मुलींना दिली जात असल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले.
प्राथमिक तपासण्या आवश्‍यक
योग्य वेळी लक्ष दिल्यास गर्भाशयाचा कर्करोग बरा होऊ शकतो. भविष्यात हा कर्करोग होऊ नये यासाठी स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या प्राथमिक तपासण्या करवून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपल्या देशातील या कर्करोगाचे प्रमाण आटोक्‍यात आणण्यात मदत होईल.
डॉ. माधुरी सुशील गावंडे
स्त्रीरोग तज्ज्ञ, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First stage cancer can be cure