कोरोनाचा वार ; नागपुरात पाच वस्त्या सील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांचा आकडा कमी असला तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील पाच परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून ते सील केले आहेत.

नागपूरः कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरातील पाच परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. यात प्रामुख्याने किल्ला महाल, न्यू इंदोरा, तांडापेठ, मॉडेल टाऊन क्रमांक 2, बिनाकी मंगळवारी या परिसराचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने तुलसीनगर व शबरी मातानगरातील प्रतिबंध हटविण्यात आले तर न्यू नंदनवनमधील प्रतिबंधित क्षेत्रात घट करण्यात आली.

शहरात आजही कोरोनाबाधित आढळून आले आहे. गांधीबाग महाल झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 18 येथील किल्ला महाल परिसर सील करण्यात आला. किल्ला परिसराच्या उत्तर-पश्‍चिमेस किल्ला गेट, अनवर बेग यांचे घर, उत्तरेस आमधरे यांचे घर, दक्षिण-पूर्वेस रवींद्र नलसाम यांचे घर आणि दक्षिण-पश्‍चिमेस हफीजभाई कपडेवाले यांच्या घरापर्यंत निर्बंध लावण्यात आले.

वाचा- ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था पाच लाख कोटींच्या घरात नेणार

आसीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 येथील मॉडेल टाऊन क्रमांक दोनच्या दक्षिण-पूर्वेस नरेश फुलवाला, दक्षिण-पश्‍चिमेस केअर फॅमेली सलून, उत्तर-पश्‍चिमेस इंदूरकर यांचे घर, उत्तर-पूर्वेस युवराज गायकवाड यांच्या घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला. याच झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 येथील न्यू इंदोरा रिपब्लिकननगरातील पश्‍चिमेस प्रफुल्ल उके यांचे घर, दक्षिण-पूर्वेस दरवाडे यांचे घर, उत्तरेस दुर्गा मेश्राम यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस राकेश सेवारे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला.

सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 5 येथील बिनाकी मंगळवारी पाठराबे वाडीतील पूर्वेस चंद्रशेखर मोहाडीकर, दक्षिणेस पेंदाम (हॅण्डपंप), पश्‍चिमेस भजनकर, उत्तरेस बाबूराव निनावे यांच्या घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले. याच झोनअंतर्गत तुमडीपुरा तांडापेठ येथील उत्तर पूर्वेस गणेश खापेकर, पूर्वेस मो.जाहीद शेख, दक्षिण-पूर्वेस नरेश तायडे, दक्षिण-पश्‍चिमेस लक्ष्मण कृपा बिल्डिंगपर्यंतचा परिसरात नागरिकांना बंदी करण्यात आली.

न्यू नंदनवनमधील क्षेत्रात घट
सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग 5 येथील तुलसीनगर तर मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग 11 मधील गोरेवाडा, शबरी मातानगर हे दोन परिसर मोकळे करण्यात आले. नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग 27 येथील न्यू नंदनवन परिसरातील प्रतिबंधित सीमा कमी करण्यात आलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five localities sealed in Nagpur after Corona attack