रेल्वेच्या बोगद्याखाली घातक शस्त्रांसह होते बसून; मग सुरू झाला 'खेळ' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

डोबीनगर भागातील रेल्वे बोगद्याखाली काही जण हातात धारदार शस्त्रे घेऊन दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यांच्याजवळून मोठा शस्त्रसाठा आढळून आला.

 नागपूर : उपराजधानीत लॉकडाउन शिथिल होताच गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुनाच्या घटना वाढल्या आहेत. भुरटे चोरही फॉर्मात आले आहेत. शनिवारी पोलिसांनी शस्त्रसाठा घेऊन अंधारात दबा धरून बसलेल्या कुख्यात आरोपींना अटक केली. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील ठाण्यातील पथक शुक्रवारी मध्यरात्री 2.15 वाजताच्या सुमारास गस्तीवर होते. डोबीनगर भागातील रेल्वे बोगद्याखाली काही जण हातात धारदार शस्त्रे घेऊन दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांना सूचना देण्यात आली. लगेच त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून दरोड्याच्या तयारीत बसलेल्या पाच जणांना मोठ्या शिताफीने अटक केली. 

सागर गौर (24) रा. टिमकी, प्रकाश ऊर्फ पक्‍या हेडाऊ (27) रा. नंगापुतला, विजेंद्र ऊर्फ सोनू दिलीप वर्मा (26) रा. विनोबा भावे नगर, कैलास गणेश गौर (24) रा. यादव नगर, गुंजन ऊर्फ चिंटू विश्‍वजित हुमणे (25) रा. गांजापेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तर, फुरकान खान रमजान खान (35) रा. डोबीनगर हा त्यांचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यास यशस्वी झाला. 

हेही वाचा : उच्चभ्रूंच्या वस्तीतून येत होती तीव्र दुर्गंधी; पोलिस पोचले तेव्हा दिसले हे... 

त्यांच्याजवळून एक कीटकनाशक स्प्रे, लोखंडी तलवार, लोखंडी चाकू, पिस्टलसारखी दिसणारी प्लॅस्टिक लायटर गन, लोखंडी टॉमी, नायलॉन दोरी असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five robbers arrested