आयपीएलमध्ये विदर्भाच्या या दोन खेळाडूंवर राहणार लक्ष

The Focus Will be on These Two Vidarbha Players in IPL
The Focus Will be on These Two Vidarbha Players in IPL

नागपूर  : संयुक्त अरब अमिरातमध्ये उद्यापासून (ता. १९) सुरू होत असलेल्या आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले असले तरी, वैदर्भींचे लक्ष केवळ उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांच्याच कामगिरीवर राहणार आहे. दर्शनला यावेळी संधी मिळणार की नाही किंवा उमेश गतवर्षीच्या कामगिरीत सुधारणा करणार काय याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये निश्चितच उत्सुकता राहणार आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे, तर अकोल्याचा युवा गोलंदाज दर्शन के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गतवर्षी ३० लाखांच्या बेस प्राईसवर पंजाबने खरेदी केलेल्या दर्शनला एकाही सामन्यात खेळविले नाही. त्यामुळे यावेळी त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल काय, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता राहील.

दर्शनने गेल्या मोसमात विदर्भाकडून घरगुती सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याला यावेळी पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्वतः दर्शनही याबद्दल आश्वस्थ आहे. आयपीएलला रवाना होण्यापूर्वी 'सकाळ'शी बोलताना त्याने हे बोलूनही दाखविले होते.

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्राविरुद्‌ध रणजी पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय दर्शनने गेल्या मोसमात सैयद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत सर्वाधिक १६ विकेट्‌स घेऊन देशात चौथे स्थान पटकाविले होते. शिवाय विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत आठ विकेट्‌स, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत २२ विकेट्‌स व २२० धावा, पाच वनडेत ११ विकेट्‌स आणि केरळविरुद्‌धच्या एकमेव रणजी सामन्यात ६५ धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केलेले आहे. 

वैदर्भींना सर्वाधिक अपेक्षा अर्थातच 'विदर्भ एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेशकडून राहणार आहेत. २०१० पासून आयपीएलमध्ये नियमितपणे खेळत असलेल्या ३२ वर्षीय उमेशसाठी गतवर्षीची आयपीएल फारशी चांगली राहिली नव्हती. अकरा सामन्यांमध्ये तो केवळ आठच गडी बाद करू शकला होता.

यावेळी आपल्या कामगिरीत सुधारणा करून बंगळुरूला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न राहणार आहे. ४५ कसोटी, ७५ वनडे व ११९ आयपीएल सामन्यांच्या भक्कम अनुभव पाठीशी असलेला उमेश कर्णधार कोहलीला प्रभावित करण्यात यशस्वी ठरल्यास त्याच्या आयपीएल करिअरला नवी उभारी मिळू शकते. शिवाय आगामी आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी भारतीय संघातही त्याचा दावा मजबूत होऊ शकतो. 
 

पाच 'नेट बॉलर'ही सहभागी 


तेराव्या आयपीएलमध्ये विदर्भाचे श्रीकांत वाघ, सौरभ दुबे, आदित्य ठाकरे, नचिकेत भुते आणि यश ठाकूर हे पाच गोलंदाजही विविध संघांकडून 'नेट बॉलर' म्हणूनही दिसणार आहेत. श्रीकांतची निवड राजस्थान रॉयल्स संघात, सौरभची मुंबई इंडियन्स संघात, आदित्यची बंगळुरू संघात, नचिकेतची पंजाब संघात, तर ठाकूरची पंजाब संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भाचेच ४५ वर्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच उल्हास गंधे यांचीही आयपीएलसाठी निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात विदर्भाचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू व पंच प्रथमच सहभागी झाले आहेत.  

संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com