कंत्राटींच्या भरोशावर घडते रुग्णसेवा, सरकारने पाळावे हे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

राज्यात 1995 मध्ये भाजप-सेना युतीचे शासन असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या पुढाकारातून विभागीय निवड मंडळामार्फत कंत्राटीकरणाचा हा आजार डॉक्‍टरांच्या माथी मारला आहे. यानंतर सातत्याने अस्थायी वैद्यकीय शिक्षकांची संख्या वाढत गेली. या कोरोनाच्या सध्याच्या काळात तर अस्थायी योद्धे कोरोनाशी जीवघेणा सामना खेळत आहेत. राज्यात वैद्यकीय शिक्षकांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहायक प्राध्यापकांच्या मागील पाच वर्षांपासून 583 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी मागील शासनाने कोणतीही पावले उचलली नाही.

नागपूर :  स्वाइन फ्लूचा प्रकोप असो की कोरोनाची आणीबाणी, अशा बिकट समयी रुग्णसेवेपासून खासगी डॉक्‍टर कोसो दूर असतात. अशावेळी सर्वांत आघाडीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थायी वैद्यकीय शिक्षक अर्थात डॉक्‍टर. आयुष्यातील आठ वर्षे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एमडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही शासन सेवेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून आयुष्य जगण्याचा खेळ कंत्राटी नियुक्तीवर सुरू आहे. कोरोनाच्या या काळात हेच अस्थायी वैद्यकीय शिक्षक इमाने इतबारे कोरोनाशी लढून रुग्णसेवेचा धर्म पाळत आहेत. दै. सकाळने याचा पाठपुरावा केल्यानंतर अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना कायम करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले. हे आश्‍वासन पाळले जावे, अशी मागणी जोर धरत आहे.

राज्यात 1995 मध्ये भाजप-सेना युतीचे शासन असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या पुढाकारातून विभागीय निवड मंडळामार्फत कंत्राटीकरणाचा हा आजार डॉक्‍टरांच्या माथी मारला आहे. यानंतर सातत्याने अस्थायी वैद्यकीय शिक्षकांची संख्या वाढत गेली. या कोरोनाच्या सध्याच्या काळात तर अस्थायी योद्धे कोरोनाशी जीवघेणा सामना खेळत आहेत. राज्यात वैद्यकीय शिक्षकांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहायक प्राध्यापकांच्या मागील पाच वर्षांपासून 583 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी मागील शासनाने कोणतीही पावले उचलली नाही.

क्लिक करा - अमरावतीचा अखेर "रेडझोन"मध्ये समावेश, आणखी सात कोरोनाबाधित आढळले

राज्यात 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेचारशेपेक्षा जास्त वैद्यकीय शिक्षक कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. त्यांना शासनाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ मिळत नाही. आरोग्याच्या संकटकाळात हेच अस्थायी सहायक प्राध्यापक अर्थात वैद्यकीय शिक्षक आपल्या पवित्र व्यवसायाच वैभव जतन करण्यासाठी संकटाशी लढत आहेत.

क्षयरोग असो की, एचआयव्हीचा राक्षस या आजारांवर उपचार करताना स्वतः डॉक्‍टर बळी पडतात. मात्र, यांच्या या त्यागाकडे कोणाचेही लक्ष नसते. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला की, डॉक्‍टरांवर हल्ला होतो, हे चित्र समाजात दिसते. मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने दस्तक दिल्यानंतरही सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निवासी डॉक्‍टर आणि कंत्राटीवर असलेले सहायक आणि सहयोगी प्राध्यापक सेवा देत आहेत.

1995 पासून भरण्यात आलेली वैद्यकीय शिक्षकांची अस्थायी पदे 2007 मध्ये तत्कालीन कॉंग्रेस सरकारने स्थायी केली होती. त्यानंतर 2016 मध्ये याच पद्धतीने चारशेवर अस्थायी सहाय्यक व सहयोगी प्राध्याकांना स्थायी करण्यात आले. यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या या अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना विद्यमान सरकारने स्थायी करण्याचा निर्णय घेऊन दिलेले आश्‍वासन पाळावे, असे महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोसिएशनचे सचिव डॉ. समीर गोलावार म्हणाले.

 

अस्थायींची इमानेइतबारे सेवा
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात, परंतु गरज म्हणून शासनाकडून कंत्राटीच्या धोरणातन तत्काळ पदे भरली. सध्या साडेचारशेवर अस्थायी सहयोगी, सहाय्यक प्राध्यापक इमानेइतबारे कोरोनाच्या या काळात सेवा देत आहेत. 2007 आणि 2016 च्या धर्तीवर निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पुढाकार घेतला. या अस्थायींना स्थायी करण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.
डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य मेडिकल टीचर्स असोसिएशन, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the assurances given to the temporary Corona warriors