Video : नागपुरात गृहमंत्र्यांच्या घराजवळ लुटले होते 18 लाख, पोलिसांनी असे केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

मानेवाडा बेसा रोडवरील ब्रिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने एजंट श्रीकांत नानाजी इंगळे (सरईपेठ, इमामवाडा) आणि सतीश धांडे हे दोघेही दुचाकीने सिव्हील लाईनमधील ऍक्‍सिस बॅंकेत रोकड जमा करण्यासाठी दुचाकीने जात असताना सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास डीआरडीओ निवासी वसाहतीच्या कोपऱ्याजवळ सहा अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना चाकूच्या धाकावर लुटले होते. हे घटनास्थळ गृहमंत्र्यांच्या घरापासून पाचशे मिटर अंतरावर असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती.

नागपूर : सिव्हील लाईनमधील 18 लाखांच्या लुटमार घटनेचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखा पोलिसांना यश आले असून सहा पैकी चार दरोडेखोरांना मंगळवारी अटक करण्यात आली. योगेश विनायक सत्रमवार (वय 32, रा. गोपाळकृष्णनगर, वाठोडा लेआउट), मंगेश वासूदेव पद्‌मगिरवार (वय 33, रा. गोपाळकृष्णनगर, वाठोडा लेआउट ), आकाश मोरेश्‍वर धोटे (वय 21, नागेश्‍वरनगर, पारडी) आणि निक्‍की उर्फ निखिल धनराज गोखले (वय 20 रा. मस्कासाथ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

मानेवाडा बेसा रोडवरील ब्रिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने एजंट श्रीकांत नानाजी इंगळे (सरईपेठ, इमामवाडा) आणि सतीश धांडे हे दोघेही दुचाकीने सिव्हील लाईनमधील ऍक्‍सिस बॅंकेत रोकड जमा करण्यासाठी दुचाकीने जात असताना सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास डीआरडीओ निवासी वसाहतीच्या कोपऱ्याजवळ सहा अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना चाकूच्या धाकावर लुटले होते. हे घटनास्थळ गृहमंत्र्यांच्या घरापासून पाचशे मिटर अंतरावर असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू झाला होता. पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, राजकुमार त्रिपाठी, हवालदार रविंद्र गावडे, शंकर शुक्‍ला, नरेंद्र ठाकूर, रवी अहिर, प्रवीण रोडे आदिंनी तपास करून आरोपींना चोविस तासाच्या आत अटक केली.

अवश्य वाचा- भरधाव वाळूच्या ट्रॅक्‍टरने घेतला व्यक्तीचा बळी...मग संतप्त जमावाने केला चक्काजाम

दुचाकीवरून लागला सुगावा

आरोपींनी वापरलेल्या तीनही दुचाकींना नंबर प्लेट नव्हती. पण घटनास्थळापासून पोलिसांनी घटना घडलेल्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुचाकींच्या रंगावरून त्यांचा माग काढला. त्यामध्ये एक दुचाकी ही वाठोडा परिसरात गेल्याचे दिसत होते. तेथील हिस्ट्रीशिटर तपासले असता योगेश सत्रमवार हा बेपत्ता आढळून आला. त्याचा शोध घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्या माहितीच्या आधारावर अन्य तिघांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या दोन साथिदारांचा शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four booked for loot of eighteen lakhs at nagpur