उपराजधानीत हत्याकांडांची मालिका; कायदा व सुवस्थेचा उपस्थित झाला प्रश्‍न

file photo
file photo

नागपूर : लॉकडाउनच्या काळात चोवीस तास चार जणांच्या खुनामुळे शहर हादरले आहे. यशोधरानगर, प्रतापनगर आणि हुडकेश्‍वर परिसरात तिघांचा तर गणेशपेठमधील एम्प्रेस मॉलजवळील झाडाझुडपातही हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या सर्व घटना पाहता उपराजधानीतील कायदा व सुवस्था बिघडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

कुऱ्हाडीने घातला घाव 
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. वैभव मूर्ती (30, रा. भोलेबाबानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना चैतन्य होमिओपॅथी फार्मसीजवळ गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता घडली. दोन तरुणांनी दुचाकीने पाठलाग करून हा खून केला असून ऋतिक ऊर्फ मांजी (रा. आशीर्वादनगर) आणि किटाणू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी कुख्यात गुंड असून त्यांचा शोध सुरू आहे. वैभव हा राजीव गांधी योजनांचे लोकांचे फॉर्म भरून पैसे कमवत होता. 

हात-पाय कापले 
एम्प्रेस मॉल परिसरातील पाठीमागे झुडपात एक कुजलेला मृतदेह गुरुवारी सापडला. मृतदेह 30 ते 35 वयोगटातील युवकाचा असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण, त्याचा खून करून मृतदेह विदर्भ अपार्टमेंटच्या पाठीमागे असलेल्या एम्प्रेस मॉलच्या खुल्या जागेतील झुडपात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाचा एक हात आणि पाय कापला असल्याचे आढळून आले. त्यावरून निर्घृणपणे खून केल्याचा संशय निर्माण झाला आहे. 

बहिणीच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला 
बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी देऊनही ऐकत नसलेल्या बहिणीच्या प्रियकराचा भावाने लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता गोपालनगरात घडली. कार्तिक सारवे (वय 24, रा. गोपालनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक सारवे हा नोकरीच्या शोधासाठी नागपुरात आला होता. त्याने गोपालनगरात भाड्याने खोली भाड्याने घेतली होती. टीव्ही केबल वितरणाच्या कामात हेमंत झोडापे यांच्या कार्यालयात कार्तिक हा वसुली आणि तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे त्याने झोडापे यांचे कार्यालय उघडले. त्यानंतर दुपारी तो आयटी पार्कजवळ असलेल्या झोडापे यांच्या कार्यालयात गेला होता. तेथून तो आपल्या (एमएच-31, ईडब्ल्यू-0374) क्रमांकाच्या दुचाकीने परत येत होता.

त्यावेळी गोपालनगरातील श्री गिफ्ट ऍण्ड टॉय दुकानाजवळून येत असताना दोन दुचाकीस्वार विक्रम आणि रामू पाठलाग करीत असताना त्याला दिसले. त्यामुळे कार्तिकने दुचाकी जोरात पळवायला सुरुवात केली. मात्र, काही अंतरावरच पाठीमागून दुचाकीने आलेल्या आरोपी विक्रमने कार्तिकच्या डोक्‍यात लोखंडी रॉड मारला. कार्तिक जमिनीवर कोसळला. त्यानंतर दुचाकीवरून उतरून दोन्ही आरोपींनी कार्तिकच्या डोक्‍यावर रॉडने सपासप वार करून जागीच ठार केले. कार्तिकला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकीने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहायक आयुक्त केशव शेंगळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णालयात पाठवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रेमासाठी वाट्टेल ते... 
कार्तिक याचे जयताळा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमाची कुणकुण तरुणीच्या भावापर्यंत पोहचली. त्यामुळे विषय वाढविण्यापेक्षा कार्तिकची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विक्रमने कार्तिकची भेट घेतली. त्याला बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी धमकी दिली. मात्र, त्याने "प्रेमासाठी वाट्टेल ते...' असे म्हणून विक्रमला फटकारले होते. 

हत्याकांड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद 
कार्तिक हा दुचाकीने जात असताना विक्रम आणि त्याचा मित्र रामू दुचाकीने पाठलाग करीत होते. कार्तिकच्या डोक्‍यावर रॉड मारून खाली पाडल्यानंतर खून करण्यात आला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील आणि काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून विक्रमसोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com