
जलालखेडा(जि.नागपूर)_ यंदा संत्र्यावर ‘मृग’ बहार येईल व यातून चांगले पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण ही आशा निसर्गाने फोल ठरवीली. मृग नक्षत्रात पाऊस, कधी उन्ह तर कधी ढगाळ हवामान तसेच सतत पावसाची रिमझिम सुरू नसल्यामुळे या बदलत्या आणि प्रतिकूल हवामानाचा फटका बागेच्या व्यवस्थापनात बसला. यामुळे संपूर्ण संत्रा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादन घटण्याची शक्यता असून शेतकरी संकटात आला आहे व त्याने बागावर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.
झाडे पानांनी बहरली, पण फुले आली नाहीत
नरखेड तालुक्यात १५२०० हेक्टरवर संत्रा फळ पिकांच्या बागा आहेत. नरखेड तालुक्यासह नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, सावनेर, हिंगणा तर अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनात अग्रेसर आहे. संत्रा पिकाचे मृग आणि अंबिया बहरात उत्पादन घेतले जाते. सर्वसाधारणपणे जून महिन्यात मृग बहर धरण्याचा कालावधी आहे. संत्रा उत्पादन क्षेत्रात मृग बहर १०० टक्के क्षेत्रावर धरला जातो. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली. याचा फटका संत्रा बागांना बसला. बागांना ताणच पडला नाही. बाग न फुटता झाडे पानांनी बहरली पण फुले आली नाहीत.शेतकरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संत्रा बागा जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. यंदा अनेक भागांत पाऊस झाला असून देखील मृग बहरातील संत्रा बागा रोगांपासून मुक्त ठेवण्यात शेतकऱ्यांना यश आले असले तरी एका वेगळ्याचे वायरसने आक्रमण केल्यामुळे आंबिया बहराचा संत्रा देखील धोक्यात आला आहे.
या अडचणींमुळे बागा धोक्यात
-सातत्याने हवामानात बदल
-तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव
-आर्द्रतेमुळे फूलगळ
-फळांचे सेटिंग न होणे
प्रतिकूल हवामानामुळे रोग नियंत्रणात अडचणी
दररोज हवामानात बदल होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे संत्रा उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून उपाययोजना करण्याचे काम सुरू करण्यात यावे. परंतू, प्रतिकूल हवामानामुळे रोग नियंत्रणात अडचणी येत आहेत.
- प्रदीप कळंबे
संत्रा उत्पादक, जलालखेडा...तर संत्रा सरणासाठी वापरला जाईल.
अधिक बागा रोगांमुळे बाधित झाल्या आहेत. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी बागा काढण्याच्या मनःस्थितीत आहेत. शासनाच्या उदासीनपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा एकदा पुन्हा संत्रा सरणासाठी वापरला जाईल.
- वसंत चांडक
माजी सभापती, पं. स. नरखेड५० टक्के घट होण्याची शक्यता
यंदा लवकर व सतत पावसामुळे संत्रा बागांना ताण पडला नाही, त्यात ओलावा निर्माण झाल्यामुळे बागात मृग बहार बहरलाच नाही. नरखेड तालुक्यात मृग बहराचे १०० टक्के नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अन्य रोगांमुळे अंबिया बहराचे देखील मोठे नुकसान होत आहे. अंबिया बहराच्या उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता आहे.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी नरखेड
संपादनःविजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.