esakal | तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोपीने गुन्ह्याचा छडा लावून तिला दिलासा देण्याकरिता तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली व अधीक्षक कार्यालय गाठले.

तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फेसबुकवर अश्‍लील मॅसेज येत असल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका युवतीला चक्‍क पोलिस कर्मचाऱ्यानेच शारीरिक संबंधाची मागणी करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून युवतीने पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या प्रकरणाची नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिस कर्मचारी तुलाराम चटप याच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 25 वर्षीय युवती ही अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक पानावर अश्‍लील संदेश मिळाले. याविरुद्ध तिने 9 जुलैला अरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार सायबर सेलकडे वर्ग केली. तिने चौकशी केली असता अरोलीच्या ठाणेदारांनी पुढील तपास सायबर सेलकडून होत असल्याची माहिती दिली. 

तिने 14 जुलैला नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल कक्ष गाठले. त्या ठिकाणी तिची भेट पोलिस शिपाई तुलाराम चटप याच्याशी झाली. त्याने तिची मदत करण्याच्या निमित्ताने गुरुवार, 16 जुलैला संध्याकाळी ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी बोलवले. त्या ठिकाणी दुसरे कार्यालय असावे, या भावनेतून पीडित महिला त्याच्या घरी पोहोचली. 

आरोपीने गुन्ह्याचा छडा लावून तिला दिलासा देण्याकरिता तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली व अधीक्षक कार्यालय गाठले. या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब तिला कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाठवले व आरोपी शिपायाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चटप याला कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हेही वाचा : आईपासून विभक्‍त झालेली बिबट्याची पिल्ले गोरेवाड्यात 

आयुक्‍तांनी दाखवावी तत्परता 
शहर पोलिस दलातील पाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बलात्कार आणि विनयभंगासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक तर मोठ्या पदावर अधिकारी आहे. त्याची फक्‍त बदली करून प्रकरण शांत करण्यात आले. तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट आपल्या विवाहित असलेल्या प्रियकराला पोलिस प्रशिक्षण केंद्रात सोबत ठेवले होते. अधीक्षक राकेश ओलाप्रमाणे पोलिस आयुक्‍तांनी तत्परता दाखविण्याची गरज आहे. 
 

go to top