esakal | आम्हाला द्या मैदान अन खेळाचे साहित्यही, अपंग खेळाडूंचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे साकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आम्ही २०१४ पासून क्रीडा साहित्याची मागणी करीत आहोत. परंतु अद्याप साहित्य मिळाले नाही. बहुतांश खेळाडू गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, महागडे साहित्य खरेदी करण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे शासनाने कल्याणकारी योजनेतून क्रीडा साहित्य द्यावे. 

आम्हाला द्या मैदान अन खेळाचे साहित्यही, अपंग खेळाडूंचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे साकडे 

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : सरावासाठी हक्काचे मैदान आणि क्रीडा साहित्य मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी अपंगांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी सोमवारी जिल्हा क्रीडाधिकारी व प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांना साकडे घातले. आमच्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 


माजी आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू व मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या अडचणी व प्रमुख मागण्या मांडल्या. उपराजधानीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अपंग क्रिकेटपटू आहेत. त्यांनी दर्शविदेशात चमकदार कामगिरी करून वेळोवेळी शहराला नावलौकिक मिळवून दिला आहे. मात्र या खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान नाही. त्यामुळे त्यांना भटकंती करावी लागते. त्यामुळे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडाधिकाऱ्यांना केली. 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*
 


याशिवाय खेळाडूंनी क्रीडा साहित्याचीही त्यांनी मागणी केली. ते म्हणाले, आम्ही २०१४ पासून क्रीडा साहित्याची मागणी करीत आहोत. परंतु अद्याप साहित्य मिळाले नाही. बहुतांश खेळाडू गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, महागडे साहित्य खरेदी करण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे शासनाने कल्याणकारी योजनेतून क्रीडा साहित्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. शिष्टमंडळात उत्तम मिश्रा, संजय भोसकर, अपंग पॉवरलिफ्टर संदीप गवई, राहुल लेकुरवाळे, अभिषेक ठवरे, आंतरराष्ट्रीय अपंग क्रिकेटपटू गुरुदास राऊत, रोशनी रिनके यांच्यासह अन्य खेळाडू उपस्थित होते. 


काही खेळाडू मदतीपासून वंचित 


राज्य शासनाने लॉकडाउनकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या बीपीएल कार्डधारक खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत घोषित केली होती. शासनाने काही खेळाडूंच्या बँक खात्यात मदत जमा केली. मात्र काहींना अजूनही मदत मिळाली नाही. त्यांना लवकर मदत देण्यात यावी, अशीही खेळाडूंनी यावेळी मागणी केली. जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांनी उरलेल्या खेळाडूंना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले. दैनिक 'सकाळ'ने 'व्यथा खेळाडूंची' ही वृत्तमालिका प्रकाशित करून गोरगरीब खेळाडूंच्या अडचणी शासनदरबारी मांडल्या होत्या. या मालिकेनंतर राज्य शासनाने ही मदत जाहीर केली होती, हे उल्लेखनीय.  

 संपादन : नरेश शेळके