esakal | आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर, कोरोना संकटात तीन रुग्णालयातील सेवा विस्कळीत
sakal

बोलून बातमी शोधा

government Ayurveda college residential doctor agitation for payment in nagpur

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे त्यांनी संप पुकारला. डॉक्टरांच्या संपामुळे मेयो, मेडिकलसह शालीनीताई मेघे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर, कोरोना संकटात तीन रुग्णालयातील सेवा विस्कळीत

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना काळात सेवा देताना आम्हाला लागण झाली. यामुळे विलगीकरणात होतो. विलगीकरणातील कालावधीतील विद्यावेतन कपात करण्यात आले. शिवाय मागील पाच महिन्यांपासून विद्यावेतनही मिळाले नाही. सांगा आम्ही काम कसं करायचं? हा सवाल आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील संतप्त निवासी डॉक्टरांचा. त्यांनी बुधवारी संप पुकारला होता. यावेळी त्यांना हा सवाल उपस्थित केला.

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे त्यांनी संप पुकारला. डॉक्टरांच्या संपामुळे मेयो, मेडिकलसह शालीनीताई मेघे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील आयुर्वेदचे दीडशे निवासी डॉक्टर अचानक संपावर गेले. येथील बहुतांश निवासी डॉक्टर मेडिकल, मेयो, शालिनीताई मेघे रुग्णालयांतील कोविड रुग्णालयासह इतरत्र सेवा देत आहेत. संप पुकारल्याने बुधवारी त्यांनी सेवेवर बहिष्कार टाकला. १५० पैकी १४० निवासी डॉक्टरांच्या सेवा संशयितांचे नमुने घेतले जात आहेत. दिव्यांगसह इतर आजार असलेल्या दहा जणांना या सेवेतून मुभा दिली आहे. 

हेही वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

कोविड काळात सेवा देताना पाच महिन्यांचे विद्यावेतन मिळाले नसल्याने ते संतप्त झाले. त्यातच निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विलगीकरण कालावधीतील वेतन कापण्यात आले आहे. यामुळे संतप्त डॉक्टरांनी बुधवारी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. कोविडमध्ये सेवा देताना अभ्यासक्रमाशी संबधित शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे कोरोनाशी संबंधित सेवा समाप्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना आयुर्वेदच्या डॉक्टरांचे विद्यावेदन वाढवण्याचे निवेदन दिल्यावरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अधिष्ठाता कक्षापुढे ठिय्या देऊन दिवसभर उपोषण करण्यात आले. 

विद्यावेतनवाढीतही अन्याय -
राज्य शासनाने अ‍ॅलोपॅथी आणि दंतरोगाच्या डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ केली आहे. २ सप्टेंबरला तसा अध्यादेश काढण्यात आला. या वाढीव विद्यावेतनाचा लाभ आयुर्वेदातील निवासी डॉक्टरांना दिला नाही. हा आयुर्वेद निवासी डॉक्टरांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  

हे ही वाचा - सावधान! नवा संसर्गजन्य आजार पसरतोय, संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यास होतेय लागण

आंदोलक डॉक्टरांना कारवाईचा इशारा -
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आयुर्वेदच्या निवासी डॉक्टरांच्या सेवा घेण्यात येत आहेत. कोविडमधील सेवा समाप्तीचे अधिकारही जिल्हा प्रशासनाला आहेत. मे महिन्यापर्यंतचे विद्यावेतन मागील महिन्यात दिले होते. १ ऑक्टोबरला अनुदान आल्याने ३ महिन्यांचे विद्यावेतन एक दोन दिवसांत डॉक्टरांना देण्यात येईल. संपकाळात निवासी डॉक्टरांवरील कारवाईचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. त्यांच्या सूचनेवरून आंदोलकांना कारवाईचा इशारा दिला गेला आहे. 
- डॉ. सुभाष राऊत, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्याालय व रुग्णालय, नागपूर

संपादन - भाग्यश्री राऊत

go to top