esakal | बहिणीच्या प्रेमविवाहाला भावाचाच होता विरोध अन्‌ दारूच्या नशेत केले हे कृत्य... 
sakal

बोलून बातमी शोधा

Grandmother murdered by drunken grandson

दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच आजीकडे पैशांसाठी तगादा लावायचा. बहिणीने आपल्या पसंतीने लग्नासाठी मुलाची निवड केली. घरच्यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. पण, लकीचा त्याला विरोध होता.

बहिणीच्या प्रेमविवाहाला भावाचाच होता विरोध अन्‌ दारूच्या नशेत केले हे कृत्य... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दारुड्या नातवाने डोक्‍यावर मोठा दगड हाणून आजीची हत्या केली. सोमवारी मध्यरात्री टीव्ही टॉवरजवळील मानवतानगर झोपडपट्टीत ही थरारक घटना घडली. पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली आहे. 

राऊलाबाई गणवीर (70) असे मृत आजीचे तर लकी गणवीर (20) असे अटकेतील नातवाचे नाव आहे. गणवीर कुटुंब मानवतानगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे. लकी आणि त्याची बहीण निकिता लहानपणापासून आजीकडेच रहायचे. तर, त्यांची आई सरिता चिंतामणनगर, भिवसनखोरी येथील दुर्गामाता मंदिराजवळ रहायची. लकी भाजीपाला विक्रेत्याकडे मजुरीकाम करायचा. पण, ते केवळ नावापुरतेच होते. 
महिन्यातील अधिकाधिक दिवस घरीच असायचा.

दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच आजीकडे पैशांसाठी तगादा लावायचा. बहिणीने आपल्या पसंतीने लग्नासाठी मुलाची निवड केली. घरच्यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. पण, लकीचा त्याला विरोध होता. याच कारणावरून तो बहिणीला मारहाणही करीत होता. परिणामी घरात तणावाचे वातावरण होते. सोमवारी रात्री लकी दारूच्या नशेत घरी आला. त्याने बहिणीसोबत भांडण उकरून काढले. तिच्यावर हातही उगारला. 

महिलांनो, लग्न समारंभात जाता? जरा सांभाळून जा...

आजीने विरोध करीत लकीलाच खडेबोल सुनावले. ती बडबड करीत असतानाच लकी घराबाहेर गेला. काही क्षणातच हातात मोठा दगड घेऊन परत आला. कोणताही विचार न करता दगडाने आजीच्या डोक्‍यावर फटका हाणला. वृद्ध आजी हा मार सहन करू शकली नाही. रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. 

घटनेमुळे घाबरलेली बहीण जोरात किंचाळली. यामुळे शेजारी गोळा झाले. शेजाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. तिथून गिट्टीखदान पोलिसांना कळविण्यात आले. लागलीच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी आरोपी नातू घरीच बसून होता. पोलिसांनी लागलीच त्याल ताब्यात घेतले. आरोपीची आई सरिता यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत लकीला अटक केली. 
 

go to top