लई दिसांनी भरल्यावानी रान झालंया...

राजेश रामपूरकर
सोमवार, 13 जानेवारी 2020

गेल्या काही वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळीत प्रचंड घट झाली होती. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूजल पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांत जानेवारीपासूनच पाणीटंचाईची चाहूल लागते. यंदा जानेवारीपर्यंत पावसाची हजेरी असल्याने अद्याप तसे चिन्ह नाही. 

नागपूर : सतत भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे चित्र असताना यंदा संथगतीने झालेला पाऊस आणि कालावधी अधिक असल्याने जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. भूजल सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे. ऑक्‍टोबरपासून जानेवारीपर्यंत झालेल्या पावसाने त्यात अजून वाढ झाली असल्याचे संकेतही मिळत आहेत. 

भूजल सर्वेक्षण विभाग दरवर्षी चारवेळा सर्वेक्षण करून भूजल पातळी मोजत असतो. भूजल सर्वेक्षण विभागाकडून जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर आकडेवारी राज्य पातळीवर दिली जाते. सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो; पण यंदा जानेवारीतही पाऊस सुरूच आहे. पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीबरोबर सप्टेंबरअखेरच्या भूजल पातळीची तुलना करून यातील घट व वाढ काढण्यात आली.

अधिक वाचा - दारू पिऊन जुने भांडण उकरून काढले आणि...

गेल्या काही वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळीत प्रचंड घट झाली होती. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूजल पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांत जानेवारीपासूनच पाणीटंचाईची चाहूल लागते. यंदा जानेवारीपर्यंत पावसाची हजेरी असल्याने अद्याप तसे चिन्ह नाही. सर्वाधिक वाढ पारशिवनी तालुक्‍यात 2.06 तर सर्वांत कमी रामटेक तालुक्‍यात 0.35 मीटरने पाणीपातळी वाढली. 

111 विहिरींचे निरीक्षण

भूजल सर्वेक्षण विभागाने 111 विहिरींचे निरीक्षण केले आहे. या विहिरी वेगवेगळ्या भागात असतात. त्यांची पातळी घेतल्यानंतर ती सर्व एकत्रित केली जाते. त्यावरून भूजल पातळी निश्‍चित केली जाते. सप्टेंबरमध्ये जवळपास सर्व तालुक्‍यांत अर्धा ते एक मीटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा - विद्यार्थी, खेळाडूंसाठी 'युथ होस्टेल', काय राहील सुविधा?

समाधानाची बाब 
यंदा पाऊस संथगतीने होता. तसेच पावसाचा कालावधी अधिक होता. परिणामी, भूजल पातळीत वाढ झाली ही समाधानाची बाब आहे. यापुढे शेतीचे नियोजन व शहरी भागात काटेकोर वापर केला तर त्याचा फायदा होणार आहे. तसेच जलव्यवस्थापनाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्याचाही फायदा झाला. 
- प्रो. दीपक मालपे, 
भूगर्भशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great increase in groundwater level in Nagpur district