
नागपूर : एक : कोरोनाच्या विळख्यात कसा सापडलो हे कळले नाही. मेयोत 20 दिवस काढले. औषधोपचारानंतर शेवटी दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. डॉक्टरांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कोरोनाशी झुंज देऊन बरा झालो. मात्र, समाजात तिरस्काराचा धनी ठरलो. शेजारी संवाद साधत नाही. जणू माझ्या घरावर बहिष्कार टाकला आहे. कोरोनाला जिंकलो; परंतु समाजासमोर हरलो.
दोन : मुझे कोरोना हुआ. बच्चा तो कोरोना के चपेट में नहीं आया. मेडिकल के डॉक्टर भगवान बनकर आये. इलाज किया. मैं ठिक हुयी. जब बडा बेटा पैदा हुआ था, तब सारे पडोसीं देखने आये थे. घर में भीड होती थी. लेकीन आज मेरे बच्चे को कोई देखने तक आया नहीं. एक-दोन नाही तर अनेक कोरोनाबाधित उपचारातून बरे झाल्यानंतरही त्यांच्याशी माणुसकी सोडून वागण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ज्यांनी कोरोनाच्या संकटावर मात केली, अशा बरे झालेल्या लोकांना मानसिक त्रास होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काही रुग्णांनी मानसिक रोगतज्ज्ञांशी संपर्क साधला. उपचारासाठी रुग्णांचे फोन येत असल्याचे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले.
समाजामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांना, संशयितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हीन वागणूक कळत न कळत मिळत आहे. डॉ. नवखरे म्हणाले की, कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीला येथील वस्तीतून जावे यासाठी वातावरण तयार केले होते. अनेक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यापासून त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा या काळात शेजाऱ्यांनी आधार देणे अपेक्षित आहे. आधार नाही मिळाला तरी ठीक, परंतु आजचे वास्तव अनुभवताना मनात असंख्य विचार येत असल्याची भावना काही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी बोलून दाखविली.
विलगीकरणातून घरी गेलेल्यांची हीच वेदना
केवळ संशयित म्हणून 14 दिवसांचा वनवास सहन केला. कोरोना नसल्याचे उघड झाले. कोरोनाचा दोन टप्प्यांमध्ये आलेल्या निगेटिव्ह अहवालासंदर्भातील प्रमाणपत्र मिळाले. आठ दिवसांपूर्वी विलगीकरणातून घरी सोडण्यात आले. मात्र, त्या दिवसापासून आमच्या घरी कोणीही आले नसल्याची वेदना तिशीतील एका युवतीने बोलून दाखवली. शेजारी तर आले नाही; परंतु नातेवाइकांनीही घरी येणे सोडले, अशी भावना व्यक्त करताना या युवतीचे डोळे पाणावले. कुटुंबाशी ओळख तसेच नाते असणाऱ्यांचे वागणे बदलले आहे. या कोरोनाविषयी भीती मान्य आहे. परंतु माणुसकीला विसरून केलेले या कृत्याने मन हेलावून गेल्याची भावनाही त्या युवतीने व्यक्त केली.
विलगीकरणातील व्यक्तीला घरी सोडून देण्यात आल्यानंतर त्यांच्याबद्दल समाजाने आस्था बाळगावी. त्यांचा तिरस्कार करू नये. अशाप्रकारे वागणे म्हणजे एकप्रकारचा सामाजिक कलंक आहे. कोरोना हा इतर आजाराप्रमाणेच आजार आहे. या आजारातून 98 टक्के लोक बरे होतात. यामुळे रुग्णांविषयी मनात तिरस्काराची भावना बाळगू नये. त्या व्यक्तीवर तसेच कुटुंबावरही मानसिक आघात होण्याची जोखीम असते. इथे फक्त प्रशासनानेच नव्हे, तर व्यक्ती म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनासारखा आजार सोशल स्टिग्मासाठी कारणीभूत ठरू नये.
-डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय उपअधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.