त्यांनी पुन्हा आक्रमण केले, पण काढावा लागला पळ...वाचा सविस्तर...

file photo
file photo

जलालखेडा (नागपूर) : काही दिवसांपूर्वी नरखेड तालुक्‍यात आलेले टोळ कीटक नुकसान न करता बाहेर पडले होते. मात्र, पुन्हा टोळधाड येऊ शकते, अशी शक्‍यता तालुका कृषी विभागाने वर्तविली होते. हा अंदाज खरा ठरला. आज (ता. 29) नरखेड तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सकाळपासूनच पुन्हा कीटक धडकले. मात्र, कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी टोळ कीटकांना हुसकावून लावले. 

नरखेड तालुक्‍यात प्रथम सोमवारी (ता. 25) मध्य प्रदेश येथून अमरावती व वर्धा जिल्हामार्गे तालुक्‍याच्या उत्तर दिशेकडे काही गावांत या कीटकांचे आगमन झाले होते. काही वेळातच टोळधाडी शेतकऱ्यांनी परतवून लावल्या होत्या. त्याच दिवशी रात्री काटोल तालुक्‍यात पोहोचल्यानंतर फवारणी केली होती. त्यामुळे कीटकांनी पलायन केले होते. तूर्त संकट टळले असले, तरी पुन्हा टोळधाड येऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. 

आज (ता. 29) पुन्हा नरखेड तालुक्‍यात टोळधाडीचे संकट मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्‍यामार्गे दाखल झाले. हे कीटक काल (ता. 28) रात्री अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्‍यात मुक्कामी असल्याची माहिती कृषी विभागाने दिली होती. यामुळे शेतकरी सकाळपासूनच सावध होते. टोळधाड ही सकाळ होताच नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी या गावात दाखल झाली. कृषी विभाग व शेतकऱ्यांनी त्यांना हाकलून लावल्याने ही टोळधाड अंबाडा, सायवाडा, थडीपवनी, खरबडी, दावसा, बानोरचंद्र, रामठी जंगल होत सायंकाळी खापा घुडन येथे पोहोचली. येथून परतवून लावल्यानंतर ती काकडधरामार्गे काटोल तालुक्‍यात पसार झाली. 

सभापती नीलिमा सतीश रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, माजी सभापती प्रवीण जोध, मंडळ अधिकारी श्री. लांडे, पर्यवेक्षक श्री. ठाकरे, कृषी सहायक श्री. वानखेडे, सरपंच, सचिव यांनी शेतात जाऊन पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर, ओमप्रकाश गहुकर, अमित वानखडे हे परिस्थितीवर नजर ठेवून होते. 


कृषी, महसूल विभाग शेतकऱ्यांच्या मदतीला 
रामटेक : गुरुवारी संध्याकाळी टोळधाडीचे रामटेक तालुक्‍यावर झालेले आक्रमण आज दिवसभर सुरू होते. कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान न होता ही टोळधाड संध्याकाळी काचुरवाही, अरोलीमार्गे भंडारा जिल्ह्याकडे गेल्याचे उपविभागीय व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. 
माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, उपविभागीय कृषी अधिकारी मिसाळ, तालुका कृषी अधिकारी माने, कृषी सहायक यांनी चारगाव, हिवरा बेंडे परिसरात धाव घेतली. न. प. रामटेकच्या अग्निशामक वाहनाद्वारे रात्री झाडांवर बसलेल्या या टोळांवर फवारणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी शेकोट्या पेटवल्या. काहींनी धूर केला तर काहींनी डबे वाजवून ही टोळधाड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक वाहनातून दोनदा फवारणी करण्यात आली. 

अरोलीतील शेतकऱ्यांमध्ये दहशत 
मौदा : तालुक्‍यात बुधवारी टोळ कीटकांनी थैमान घालून भंडारा जिल्ह्यात गेले होते. परंतु, आज परत तालुक्‍याच्या अरोली परिसरात टोळधाड झाली. आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याकडून कोदामेंढीमार्गे अरोली-चोखाळा-मसला मार्गाने सावनेरकडे मोर्चा वळविला. पिकांचे नुकसान केले नसले, तरी पुन्हा परतण्याची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे. 


आज नरखेड तालुक्‍याच्या काही गावशिवारात टोळ दाखल झाल्या होत्या. पण, शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पलायन केले. तरी त्या पुन्हा येऊ शकतात. त्यामुळे फवारणीची संपूर्ण व्यवस्था केली आहे. कीटकांचे आणखी दोन थवे मध्य प्रदेशात आहेत. ते येण्याची दाट शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. 
-डॉ. योगीराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com