लालची कुठले... मुलाला ऑडी कार घेण्यासाठी मागत होते हुंडा... मात्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

सासरच्या मंडळींनी निधीला ऑडी कारची मागणी केली. पतीकडून संसाराचे सुख मिळणे दूरच; मात्र उलट पैशासाठी सतत छळ सुरू असल्याने निधी खचली होती. सासरच्यांकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून निधीने घरी बेडरूममध्ये सीलिंग फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर : नवविवाहितेकडून 20 लाख रुपये उकळल्यानंतरही ऑडी कार घेण्यासाठी पतीसह सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करायची. सततच्या छळामुळे नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. निधी अजय सिंह (26, रा. इंद्रायणीनगर, गोरेवाडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती पती, सासू आणि सासऱ्यासह 5 जणांवर गुन्हे दाखल केले. 

अजय सिंह (27) याचे 11 महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील नातेवाईक युवती निधी हिच्यासोबत लग्न झाले. अजय नामांकित खासगी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीवर आहे. त्याचे लग्न मोठ्या थाटात झाले. सासरच्या मंडळीने लाखोंमध्ये खर्च करीत जावई आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. मात्र, लग्नानंतर पती, सासू आणि सासऱ्यासह नणंद व मोठे सासरे पैशासाठी निधीला त्रास द्यायचे. लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्या खात्यातील 9 लाख 50 हजार रुपये देण्याची मागणी केली. तसेच नगदी 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची मागणी केली. तिने त्रासाला कंटाळून 20 लाखांपेक्षा जास्त रक्‍कम पती आणि सासरच्या मंडळींना दिली.

हेही वाचा : रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले; मग त्या मुलींनी घेतला हा निर्णय...

मात्र, हा प्रकार तेवढ्यावर थांबला नाही. सासरच्या मंडळींनी निधीला ऑडी कारची मागणी केली. पतीकडून संसाराचे सुख मिळणे दूरच; मात्र उलट पैशासाठी सतत छळ सुरू असल्याने निधी खचली होती. सासरच्यांकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून निधीने घरी बेडरूममध्ये सीलिंग फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. निधीने आत्महत्या केल्याचे वडील आणि माहेरच्या मंडळींना समजताच ते नागपूरला दाखल झाले. त्यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात पती अजय सिंह, सासरे विनोद सिंह (50), सासू सुमन सिंह (48), नणंद अंजली सिंह (22) आणि मोठे सासरे ब्रिजनाथ सिंह (55) यांचा समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही. सर्व आरोपी सध्या फरार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harassment of a woman for a car