esakal | हरियाणाच्या एटीएम लुटारू टोळीला अटक, फास्टॅगमुळे लागला छडा
sakal

बोलून बातमी शोधा

Haryana gang arrested for ATM robbery action taken by rural police

साजीद रशीद खान (२८), अहमद्दीन उस्मान (२२), तौफिक मंमरेज खान (२७), आणि जैनुल आबदीन ऊर्फ दुरु अयुब खान (२२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार काला व ताजीर ऊर्फ पहेलवान फरार आहेत.

हरियाणाच्या एटीएम लुटारू टोळीला अटक, फास्टॅगमुळे लागला छडा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर  : महामार्गांवरील एटीएम गॅस कटरने कापून पैसे लुटणाऱ्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. या टोळीने नागपुरातील दोन व तेलंगणमधील एटीएम फोडून रक्कम लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ४९ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

साजीद रशीद खान (२८), अहमद्दीन उस्मान (२२), तौफिक मंमरेज खान (२७), आणि जैनुल आबदीन ऊर्फ दुरु अयुब खान (२२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार काला व ताजीर ऊर्फ पहेलवान फरार आहेत. सर्व आरोपी हरयाणातील मेवात व अलवर जिल्ह्यातील आहेत. 

३ ऑक्टोबरच्या पहाटे मनसर येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम कापून १९ लाख ९० हजार रुपये रोख लंपास करण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. एटीएमच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक ट्रक उभा दिसत असून त्याच्या भोवताल तीन ते चार तरुणांची संशयास्पद हालचाल दिसत होती. त्यावरून पोलिसांनी टोल नाक्यावर चौकशी करून ट्रकचा क्रमांक मिळवला. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
 

हा क्रमांक बनावट होता. पण, ट्रकवर लागलेल्या फास्टॅगवरून आरजे-१४, जीके-६९४९ क्रमांकाच्या ट्रकची खरी माहिती मिळाली.
मेवातमधील हा ट्रक चेन्नई येथे फॉरेज इंडिया प्रा. लि. कंपनीत रबर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांचे वाहन पाठलाग करू लागले. दरम्यान, तेलंगणमध्ये येणाऱ्या नालगुंडा येथील एसबीआयचे एटीएम कापण्यासाठी टोळी थांबली व तेथूनही ११ लाख रुपये लुटले. 

त्यानंतर पुढे जाऊन आरोपी झोपले. चेन्नईच्या कंपनीत ट्रक पोहोचत असताना ग्रामीण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये रोख, गॅस कटर, ट्रक व इतर साहित्य असा ४९ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे उपस्थित होते.


देवलापार, धापेवाड्यातही एटीएम फोडले

या टोळीने मनसरसह देवलापार येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. पण, एटीएम फोडत असताना नागरिकांच्या हालचालींमुळे त्यांना पळ काढावा लागला. त्याशिवाय धापेवाडा मार्गावरील एटीएम फोडल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींमध्ये ट्रक मालकही आरोपी आहे. ट्रकमधून प्रवास करताना महामार्गांवरील एटीएम फोडणारी ही पहिलीच टोळी आहे. 

संपादन  : अतुल मांगे