'लॉकडाऊन'च्या काळात पोट भरण्यासाठी नवा फंडा, दुचाकीवरून तो विकतोय चहा, समोसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कुटुंबियांच्या पोटाला चिमटे बसत असल्याने दुकान सुरू करण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी एका तरुणाने दुचाकीवरून चहा, समोसा विकण्यास सुरुवात केली.

नागपूर : लॉकडाऊनने अनेक लहान व्यावसायिकांच्या संसाराची घडी विस्कटली. वाढत्या लॉकडाऊनमुळे आता अनेकांचा संयम संपुष्टात आला आहे. शहरातील गरीब समोसा, चहा विक्रेताही याला अपवाद नाही. कुटुंबियांच्या पोटाला चिमटे बसत असल्याने दुकान सुरू करण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी एका तरुणाने दुचाकीवरून चहा, समोसा विकण्यास सुरुवात केली.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून  टपरीवरील चहाचा गोडवाच हरवला. त्याचप्रमाणेच चहा, समोसा आदी विक्री करून संसाराचा गाडा हाकणाऱ्यांसाठीही लॉकडाऊनचा काळ कटू अनुभवाचाच ठरला. लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संघटनांनी गरीब व्यावसायिक, मजूरांना धान्य आदीची मदत केली. अजूनही काही संघटनामार्फत मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, किती दिवस इतरांच्या भरवशावर जगायचे? असा विचार करीत अनेकांप्रमाणेच धंतोलीतील ठाकरे नामक टपरीचालकानेही स्वाभिमानाने जगायचे ठरवले. गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिकही रस्त्यावर आले. मात्र, टपरीचालकांना अद्यापही टपरी सुरू करण्याची परवानगी नाही. एकीकडे मोठ्या आस्थापनांना आठवड्यातून चार दिवस दुकाने सुरू करण्याची मंजुरी महापालिकेने दिली. परंतु टपरी सुरू करण्याची परवानगी नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून होणारी कुटुंबाची परवड बघण्याऐवजी या तरुणाने थेट दुचाकीवरून चहा व समोसा विक्री सुरू केली. संसाराला मीठभाकर मिळावी यासाठी सकाळी व सायंकाळी दोन तास तो धंतोली, रामदासपेठ या परिसरातील हॉस्पिटल्स, दुकानांमध्ये चहा, समोसा आदी पुरवित आहे. 'कुटुंबासाठी फिरतोय, किती दिवस दुकान सुरू करण्याची प्रतीक्षा करणार? लहान मुले, वृद्ध आई-वडील यांची परवड बघवत नाही. त्यामुळे जगण्यासाठी दुचाकीवरून समोसा, चहा विकतो', असे या तरुणाने सांगितले. लॉकडाऊनच्या काळात चहा विक्री करून काही गुन्हा करीत नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाझरचा आदीचा वापर करून नियम पाळत असल्याचे तो म्हणाला. त्याची चहाची टपरी असूनही केवळ लॉकडाऊनमुळे इतरांप्रमाणे हा तरुणही रस्त्यावर आला. ही नियमाची पायमल्ली असली तरी हात-पाय सुखरुप असताना उपाशी राहणे हा त्या तुलनेत मोठा गुन्हा असल्याचे तत्वज्ञानही त्याने सांगितले.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...
दररोज अडीच-तीनशे रुपये खिशात
टपरीवरून दररोज पाचशे ते सहाशे रुपये खिशात येत होते. त्यावर संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थित सुरू होते. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून धंदा बंद होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले. आता दुचाकीवरून फिरून अडीच-तीनशे रुपये खिशात येतात. त्यात पेट्रोलचाही खर्च आहे. त्यातून शिल्लक कुटुंबासाठी, असे सध्या सुरू असल्याचे हा तरुण म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He is selling tea & samosa on two wheeler in lockdownn