rain
rain

काय सांगता! नागपूरात येणार धो धो पाऊस? उकाड्यापासून होणार सुटका

नागपूर : पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. ढगाळ वातावरण व उकाड्यामुळे नागपूरकर घामाघूम झाले असून,अस्वस्थताही वाढली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील द्रोणीय स्थितीमुळे विदर्भात पुढील चोवीस तासांत जोरदार पाऊसही अपेक्षित आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज ढग दाटून येत आहेत. क्वचित हलक्याफुलक्या पावसाच्या सरी बरसतात. ऊन व ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली असून, पारा ३५ अंशांवर गेला आहे. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढून उकाडा जाणवू लागला आहे.

हवामान विभागाने दोन- तीन दिवस विदर्भ व मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील चोवीस तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबणार
तीन महिने बरसल्यानंतर आता पावसाला परतीचे वेध लागले आहेत. मात्र, हवामान खात्याने यावर्षी राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पावसाळी वातावरण पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. परतीच्या प्रवासाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानच्या दक्षिण भागातून सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे १ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यावर्षी हवामान विभागाने परतीच्या प्रवासाची तारीख १७ सप्टेंबर दिलेली आहे.

सविस्तर वाचा - आहे की नाही चमत्कार! हात न लावताच वाजते इथली घंटा

बंगालच्या उपसागरात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा प्रवास लांबण्याचे मुख्य कारण आहे. दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून कर्नाटकपर्यंतची द्रोणीय स्थिती आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीचाही प्रभाव दिसून येत आहे. याशिवाय चार-पाच दिवसांनंतर याच भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com